rural women development Pudhari
रायगड

Women Farmer Policy: चालू अधिवेशनात महाराष्ट्राचे पहिले ‘कृषी महिला शेतकरी धोरण’ मंजूर होणार; आदिती तटकरे यांची घोषणा

न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

पुढारी वृत्तसेवा

श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा: राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख व न्याय देण्यासाठी 'महाराष्ट्र कृषी महिला शेतकरी धोरण' चालू विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार असून, ते दोन्ही सभागृहांत मंजूर केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.

न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळाव्यात त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी या धोरणास सहमती दर्शविल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले.

सातबारावर नाव नसले तरी 'महिला शेतकरी' म्हणून मान्यता

महिला शेतकरी धोरणाबाबत सविस्तर माहिती देताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्यातील बहुतांश शेतीची नोंद सातबारा उताऱ्यावर पुरुषांच्या नावावर असल्यामुळे शेतीत प्रत्यक्ष राबणाऱ्या महिलांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

मात्र, शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचा तितकाच महत्त्वाचा सहभाग असतो. म्हणूनच, सातबारा उताऱ्यावर नाव नसले तरी महिलांच्या श्रमांचा सन्मान व्हावा आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे धोरण आणले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा उल्लेख करत मंत्री तटकरे यांनी शेतकरी बांधवांना रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आवाहन केले.

तसेच, नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या आंबा व इतर बागायती शेतीसाठी अधिक नुकसानभरपाई मिळण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. यंदा पाऊस कमी-अधिक राहण्याची शक्यता असल्याने, पंचायत समिती आणि कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून योग्य मार्गदर्शन करावे, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या मेळाव्यात मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कृषी योजना माहिती पुस्तिका २०२६-२७' चे प्रकाशन करण्यात आले. तसेच म्हसळा तालुक्यात प्रगतशील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र व बियाणे देऊन सन्मान करण्यात आला.

मेळाव्यादरम्यान महिला बचत गटांच्या स्टॉलना भेट देऊन मंत्री तटकरे यांनी त्यांच्या स्वावलंबनाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी राजू किरवे यांनी केले. तर सभापती बबन मनवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते आणि कृषी अधिकारी विशाल जाधव यांनी शासकीय योजनांची माहिती दिली.

यावेळी तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, अभिषेक विचारे, नगराध्यक्ष सुनील शेडगे, उपसभापती लहू म्हात्रे, उपनगराध्यक्षा श्रीमती जाधव, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार सचिन खाडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय शिंदे यांसह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT