Lek Ladki Yojana Pudhari
रायगड

Raigad news | लेक लाडकी योजनमुळे मुलींच्या शिक्षणास चालना

Lek Ladki Yojana benefits | जानेवारी 2024 ते मार्च 2026 दरम्यान एकूण 6 हजार 280 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा दिवेकर

अलिबाग: राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे 1 एप्रिल 2023 रोजी अथवा नंतर जन्माला येणा-या मुलीसाठी ‘लेक लाडकी’ योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात जानेवारी 2024 ते मार्च 2026 या कालावधीत एकूण 6 हजार 280 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेमुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणा-या कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी मदत होत आहे.

राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशारितीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ देण्यात येतो.

शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी )द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येते. 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणा-या 1 अथवा 2 मुलींना त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळतो. दुस-या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.

रायगड जिल्ह्यामध्ये जानेवारी 2024 ते मार्च 2026 या कालावधीत 7 हजार 198 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी एकूण 6 हजार 280 लाभाथ्र्यांना प्रत्येकी 5000 रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरीत 918 लाभाथ्र्यांना निधी उपलब्ध झाल्यानंतर ताताडीने लाभ देण्यात येणार आहे. 6 हजार 280 लाभाथ्र्यांना एकूण 3 कोटी 14 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक यांनी केले आहे.

योजनेसाठी अटी :

1. आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील.

2. 1 एप्रिल 2023पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

3. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल.

4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे :

1. लाभार्थी जन्माचा दाखला

2. कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला याबाबात तहसिलदार किंवा सक्षम अधिका-यांचा दाखला आवश्यक

3. लाभार्थीचे आधारकार्ड

4. पालकांचे आधारकार्ड

5. लाभार्थी व माता यांच्या संयुक्त बॅक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

6. रेशनकार्ड पिवळे अथवा केशरी छायांकित प्रत

7. अंतिम लाभाकरीता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT