रायगड : मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नसताना टोल वसुली करण्यास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विरोध केला आहे. कामे पूर्ण होत नाही, तोवर टोल वसुली करू नये, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तशी विनंती केली जाणार असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
महामार्ग प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथे टोल वसुली सुरू केली आहे. चारचाकी वाहनांकडून तब्बल ९५ रुपये कर आकारणी केली जात आहे. तीन महिन्यांसाठी कल्याण इन्फ्रा या कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. १५ तारखेपासून टोल वसुली सुरू झाली आहे. मात्र, महामार्गाची कामे अपूर्ण असताना टोल वसुली सुरू झाल्याने, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान खारपडा टोल वसुलीला राजकीय विरोधही वाढण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेना, शेकाप आणि आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही या टोल वसुलीला विरोध दर्शवला आहे. राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेल्या टोल वसुली विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाची कामे अपूर्ण असताना टोल वसुली करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तशी विनंती केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.