Gram Panchayat Officer Attack Pudhari
रायगड

Gram Panchayat Officer Attack: जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामसेवकांचा मूकमोर्चा; शिवरे ग्रामपंचायत अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा नोंदविला निषेध

रायगडमधील ग्रा.पं.चे प्रशासकीय कामकाज ठप्प

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: शिवरे, ता. पारोळा, जळगाव येथे आयोजित ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी के.पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

या घटनेचा निषेध करण्यासाठी व याबाबत ग्रामसभेच्या वेळी अधिकार-यांना पोलिस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन रायगडच्या वतीने मंगळवारी (१ सप्टेंबर) मूकमोर्चा काढत तीव्र निषेध करण्यात आला.

घटनेच्या निषेधार्थ कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत. यामुळे रायगड जिल्ह्यातील ५७५ ग्रामसेवक या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून ग्रामपंचायतीचे कामकाज जवळजवळ ठप्प झाले. ग्रामसभेमध्ये कर्तव्यावर असलेल्या ग्रामपंचायत अधिका-याचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचा-यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, याबाबत या घटनेचा निषेध म्हणून तसेच ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचा-यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य संघटनेने १८ ऑगस्टपासून आयोजित करण्यात येणा-या ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ग्रामसभांच्या अनुषंगाने यापूर्वीदेखील अनेक ठिकाणी वादविवाद, शिवीगाळ, धमकी, धक्काबुक्की व मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिका-यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यापूर्वीपासूनच गंभीर आहे.

तसेच काही ठिकाणी काही गावांतील असामाजिक नागरिकांकडून ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी करण्यात येत असून, त्यांच्यावर अनावश्यक प्रशासकीय, सामाजिक दबाव निर्माण केला जात आहे.

या सर्व बाबींचा विचार करता, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचा-यांना त्यांचे कर्तव्य बजावतामा सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे तसेच अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई १३६ राज्य संघटनेच्या ठरावानुसार १८ ऑगस्टपासून अनिश्चित कालावधीसाठी ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या मूक मोर्चासाठी राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन रायगडचे अध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस जितेंद्र म्हात्रे, कार्याध्यक्ष सुशांत चिले, उपाध्यक्ष उमाजी माडेकर, महिला उपाध्यक्ष रेश्मा ठाकूर आदींसह जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT