Maharashtra Coconut Production Pudhari
रायगड

Maharashtra Coconut Production : नारळाच्या उत्पादकतेत महाराष्ट्राची उंच भरारी !

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यांत सर्वाधिक क्षेत्र : मात्र केरळम उत्पादन क्षेत्रात अव्वल

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

हिंदू धर्मशास्त्रानुसार नारळाला 'श्रीफळ' म्हणजेच लक्ष्मीचे फळ मानले जाते, जे शुभता, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे. नारळ सृजनाचे आणि पूर्णत्वाचे प्रतीक असल्याने कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात, कलश पूजन किंवा पाहुण्यांचा सत्कार करताना श्रीफळ देऊन त्या कार्याला दैवी आशीर्वाद मिळवून देण्याची प्राचीन परंपरा आहे. नारळ शेती हा महाराष्ट्र आणि केरळम या दोन्ही राज्यांच्या किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. केरळमला 'नारळाचा देश' (लॅन्ड ऑफ कोकोनट) म्हटले जात असले, तरी तंत्रज्ञानाच्या जोरावर महाराष्ट्राने नारळ उत्पादकतेमध्ये मोठी झेप घेतली आहे.

महाराष्टातील चार तर केरळममधील तीन जिल्हे नारळ उत्पादनात आघाडीवर

महाराष्ट्रात नारळाचे मोठे क्षेत्र कोकण किनारपट्टीत प्रमुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या चार जिल्ह्यामध्ये आहे. त्यातुलनेत केरळमधील कोझिकोड, मल्लपुरम, त्रिवेंद्रम या तीन जिल्ह्यात नारळाचे क्षेत्र आहे. महाराष्ट्रात नारळाचे एकुण लागवड क्षेत्र ०.४७ लाख हेक्टर आहे तर केरळमध्ये नारळ क्षेत्र ७.६० लाख हेक्टर आहे. नारळ उत्पादनाचा विचार करता महाराष्ट्रात ५५ कोटी फळांचे उत्पादन होते तर हेच उत्पादन केरळमध्ये ७०० कोटी फळांचे आहे. असे असले तरी प्रतिहेक्टरी नारळ उत्पादनात महाराष्ट्र केरळमच्यापुढे आहे. केरळममध्ये प्रति हेक्टरी नारळ उत्पादन ८००० नारळांचे आहे तर महाराष्ट्रात प्रति हेक्टरी नारळ उत्पादन ११००० नारळांचे आहे.

आर्थिक उलाढाल

केरळमची अर्थव्यवस्था नारळावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तेथे नारळ तेलाचा वापर खाद्यतेलासाठी होतो. वर्षाकाठी केरळमध्ये नारळ क्षेत्राची आर्थिक उलाढाल १५,००० कोटींपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात नारळाचा वापर प्रामुख्याने पूजेसाठी, ओल्या नारळाच्या स्वरूपात आणि शहाळ्यांसाठी केला जातो. मुंबई आणि पुण्याच्या बाजारपेठेमुळे शहाळ्यांच्या विक्रीतून मोठी उलाढाल होते. महाराष्ट्रातील उलाढाल ३००० कोटींच्या घरात आहे.

उत्पादकतेत महाराष्ट्राची आघाडी

केरळम आणि महाराष्ट्राची तलना करताना एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे उत्पादकता. महाराष्ट्रात प्रति हेक्टर नारळाचे उत्पादन केरळपेक्षा जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील हवामान आणि कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले प्रगत वाण. केरळमधील अनेक झाडे जुनी झाली असून तिथे 'रूट विल्ट' (रुट विल्ट) सारख्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त आहे, तर महाराष्ट्रातील बागा तुलनेने नवीन आणि वैज्ञानिक दृष्ट्या व्यवस्थापित आहेत.

नारळ एक पीक नव्हे तर जीवनशैली

नारळ हे केवळ एक पीक नसून ती जीवनशैली असल्याने दोन्ही राज्यात त्याला महत्त्व आहे.

नारळातून कोकणात ५० हजार नव्या रोजगार संधी

कोकणात नारळ क्षेत्रात ५० हजार नव्या रोजगार संधी निर्माण होत आहेत. केरळमध्ये नारळ उद्योगातून सुमारे १५ लाख लोकांना रोजगार मिळतो, जिथे 'नारळ उत्पादक कंपन्या' अत्यंत सक्रिय आहेत. महाराष्ट्रात काढणीसाठी 'पाडेकरी', पर्यटन वाढल्याने शहाळी विक्री आणि 'नीरा' उत्पादनामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सध्या कोकणात ८ लाख लोक या उद्योगाशी जोडलेले आहेत. विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील काथ्या क्लस्टर्सद्वारे १० हजार ग्रामीण महिलांना रोजगार मिळत आहे. राज्य शासनाच्या काथ्या धोरणांतर्गत आगामी काळात ५० हजार नवीन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT