कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र अग्रेसर pudhari photo
रायगड

Maharashtra Agriculture | कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र अग्रेसर

पुढारी वृत्तसेवा
रायगड : जयंत धुळप

भारतामध्ये एकूण 200 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्या पैकी महाराष्ट्रामध्ये 38 कृषी उत्पादनांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त झाले आहे. कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामध्ये कोकणातील रायगडमधील पांढरा कांदा, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जांभूळे, पालघर जिल्ह्यातील घोलवड चिकू, बहाडोली जांभूळ, सिंधुदुर्गमधील वेंगूर्ला काजू, कोकम तर रत्नागिरीतील कोकण हापूस व कोकम या कृषी उत्पादनांचा समावेश आहे.

राज्यात एकूण 38 कृषी व फलोत्पादन पिके,उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पिकाच्या उत्पादकांची भौगोलिक संकेत (नोंदणी व संरक्षण) अधिनियम 1999 अंतर्गत अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी केल्यास भौगोलिक चिन्हांकनाचा लोगो लावून उत्पादनाची विक्री करता येते.

पिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माची ओळख निर्माण करुन विक्री केल्यास उत्पादकास अधिकची किंमत मिळते. राज्याला लाभलेले वैशिष्ट्यपूर्ण वातावरण व नैसर्गिक जैवविविधतेमुळे नवीन कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त करण्यास प्रचंड वाव आहे. देशातील नवीन पिकास भौगोलिक मानांकन अदा करण्याची कार्यवाही चेन्नई येथील भौगोलिक मानांकन रजिस्ट्री येथून करण्यात येते.

विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी भौगोलिक चिन्हांकन

भौगोलिक चिन्हांकन ही एक प्रकारची मानांकन नोंद आहे, जी भौगोलिक क्षेत्राशी निगडीत आहे. नैसर्गिकरीत्या व मानवी प्रयत्नातून उत्पादीत होणार्‍या कृषी मालाची ओळख, त्याद्वारे त्याच्या खास गुणवत्तेतील सातत्य व त्यांच्यामधील विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी भौगोलिक चिन्हांकन उपयुक्त आहे.

नोंदणीसाठी विशेष मोहीम

राज्यात भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाचे अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येते. सन 2019-20 अखेर 1 हजार 232 उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली होती. संचालक फलोत्पादन विभागामार्फत उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याने सन 2024 अखेर 11हजार 423 उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली आहे. कृषी उत्पादनाच्या देशात एकूण झालेल्या उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीमध्ये महाराष्ट्राचा 61 टक्के वाटा आहे. तसेच 5हजार प्रस्तावांना देखील लवकरच मान्यता मिळून अधिकृत वापरकर्ता नोंदणीत मोठी वाढ होणार आहे.

अधिकृत वापरकर्ता नोंदणीने भौगोलिक क्षेत्राशी निगडित मालास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. भौगोलिक चिन्हांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात, अशा नोंदणी करत कृषी मालास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडींग होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्त्व असते तेच महत्त्व कृषिमालाच्या भौगोलिक चिन्हांकनासह असते, त्यामुळे असे नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो. भौगोलिक मानांकन प्राप्तीमुळे भारतीय कृषी निर्यातीस जागतिक बाजारपेठेत निश्चितच लाभकारक ठरणार आहे.

भौगोलिक मानांकन प्राप्त जिल्हानिहाय उत्पादन

रायगड-अलिबाग पांढरा कांदा, पालघर डहाणू - घोलवड चिकू, बहाडोली जांभूळ,ठाणे- बदलापूर जांभूळ, सिंधुदुर्ग-वेंगुर्ला काजू, सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकम, कोकण हापूस, पुणे पुरंदर अंजिर, आंबेमोहर तांदूळ, सोलापूर डाळिंब, मंगळवेढा ज्वारी, कोल्हापूर अजरा, घनसाळ राईस गूळ, सांगली हळद, बेंदाणा, सातारा वाघ्या घेवडा, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, नाशिक द्राक्ष, नाशिक व्हॅली वाईन, लासलगाव कांदा, जळगाव केळी, भरीत वांगी, नंदुरबार नवापूर तुरडाळ, आमचूर, मिरची, जालना मोसंबी, दगडी ज्वारी, बीड सिताफळ, छत्रपती संभाजी नगर, मराठवाडा केसर, लातूर पान चिंचोली चिंच, बोरसुरी डाळ, काष्टी कोथिंबीर, धाराशिव कुंथलगिरी खवा, हिंगोली बसमत हळदी (हळद), नागपूर भिवपुरी लाल मिरची, संत्रा, वर्धा वायगाव हळद, भंडारा चिन्नोर भात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT