महाड शहरावर पाणीटंचाईचे सावट  pudhari photo
रायगड

Mahad water shortage : महाड शहरावर पाणीटंचाईचे सावट

काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू, धरणातील पाणीसाठा अत्यल्प

पुढारी वृत्तसेवा

महाड : उन्हाळ्याची नुकतीच सुरुवात झाली असतानाच महाड शहरात पाणीटंचाईचे संकेत दिसू लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील काही भागांमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याची टंचाई जाणवू लागली असून काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेला काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

एमआयडीसीकडून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच कुर्ले व कोथुर्डे धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर मर्यादा आल्याने शहरातील अनेक भाग प्रभावित झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल विसावा ते चांभारखिंड, काकरतळे परिसरातील काही भाग, नवेनगर, पंचशीलनगर, ग्रीनपार्क, सुतारआळी तसेच दादली गावाकडून येणाऱ्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणारा तांबटभुवन परिसर, आनंदनगर, सावित्री एनक्लेव्ह, बडोदा बँक ते स्मशानभूमी परिसर या भागात सध्या पाणीटंचाई जाणवत आहे.

महाड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाकडून राबविण्यात येत असलेला कोथेरी धरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या काही मागण्या प्रलंबित असल्याने या प्रकल्पाचे घळभरणीचे काम सध्या रखडले आहे. सुमारे 90 टक्के पुनर्वसन पूर्ण झाले असले तरी उर्वरित प्रश्न निकाली न लागल्याने प्रकल्प पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, कोथुर्डे धरणातील काही पाण्याचा हिस्सा रायगड खोऱ्यातील तसेच खाडेपट्ट्यातील दासगाव विभागातील गावांकडे सोडला जात असल्याने महाड शहराला मागील काही वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वाढते शहरीकरण व वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी ठोस नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सध्या तरी महाड शहरासाठी एमआयडीसीचा पाणीपुरवठा हा मोठा आधार मानला जात आहे. लोकप्रतिनिधींनी, विशेषतः मंत्री भरत गोगावले यांनी याकडे लक्ष देऊन सहकार्य केल्यास पाणीटंचाईचे संकट कमी होण्यास मदत होऊ शकते. एकूणच, महाडकरांसाठी आगामी दोन महिने पाणीटंचाईचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दररोज 65 लाख लिटरची गरज

महाड शहराला महाड नगरपरिषदेच्या मालकीच्या कुर्ले धरणातून, पाटबंधारे विभागाच्या कोथुर्डे धरणातून तसेच प्रामुख्याने एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. शहराची रोजची पाण्याची गरज सुमारे 60 ते 65 लाख लिटर इतकी आहे. शहरात सध्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे काम सुरू असले तरी उपलब्ध पाणीच कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणात येत असल्याने येत्या उन्हाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT