Veer Railway Station Mangala Express Infant Death
महाड : छत्तीसगडहून कन्नूरकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या कुटुंबातील अवघ्या १५ दिवसांच्या बाळाचा शुक्रवारी (दि.४) वीर रेल्वे स्थानकाजवळ अचानक मृत्यू झाला. तापाने आजारी असलेल्या बाळाची प्रवासादरम्यान प्रकृती खालावल्याने ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लारखा हे पत्नी, दोन वर्षांची मुलगी आयफा आणि नुकतेच जन्मलेले बाळ मोहम्मद हसन यांच्यासह २ सप्टेंबर रोजी छत्तीसगडहून कन्नूरकडे मंगला एक्स्प्रेसने निघाले होते. अल्लारखा हे कन्नूर येथे मोटारसायकल मेकॅनिक म्हणून काम करतात. ते मूळचे उत्तर प्रदेशातील असून, त्यांची पत्नी छत्तीसगड येथील आहे. मोहम्मद हसनचा जन्म त्याच्या आईच्या गावी छत्तीसगड येथे झाला होता.
प्रवास सुरू झाल्यानंतर बाळाला ताप आला. भुसावळ रेल्वे स्थानकावर त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतरही त्याची प्रकृती सुधारली नाही. वीर रेल्वे स्थानकाजवळ मंगला एक्स्प्रेसमध्ये बाळाची हालचाल बंद झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली.
सकाळी सुमारे ९ वाजता मंगला एक्स्प्रेस वीर स्थानकात थांबवण्यात आली. रेल्वे प्रशासनाने बाळाला दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य जाधव यांनी तपासणी करून बाळाला मृत घोषित केले.
यानंतर दासगाव आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार रेल्वे पोलिस आर. एम. चव्हाण आणि होमगार्ड सिद्धांत मोरे यांच्या माध्यमातून बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आला.