मंत्री भरतशेठ गोगावले यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.  Pudhari Photo
रायगड

महाड ट्रॉमा केअर संदर्भात ८ दिवसांत आरोग्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊ: मंत्री गोगावले

Bharatshet Gogawale | Raigad News | आरोग्य अधिकाऱ्यांना सक्त सुचना

पुढारी वृत्तसेवा

महाड, पुढारी वृत्तसेवा : मुंबई - गोवा महामार्गावर चार दिवसांपूर्वी वीर रेल्वे स्टेशन समोर महाड शहरातील चार युवकांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या संदर्भात येत्या आठ दिवसांत आरोग्यमंत्र्यांसमवेत मंत्रालयात तातडीची बैठक घेतली जाईल. महाड येथील ट्रॉमा केअर मधील अत्यावश्यक गरजांची पूर्तता करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज (दि.९) शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.

आज पावतो ट्रॉमा केअर व संबंधित यंत्रणांकडून झालेल्या चुका सुधारा, अन्यथा संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशारा त्यांनी या बैठकीत दिला. या बैठकीला प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवमाने, तालुका आरोग्य अधिकारी ट्रॉमा केअर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. शंतनु डोईफोडे, श्रीमती डॉ. पोरे आदीसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव, कार्यकारी अभियंता महेश नामदेव आदी उपस्थित होते.

चार दिवसांपूर्वी महाड शहरातील चार युवकांचा राष्ट्रीय महामार्गावरील झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू व त्यासंदर्भात नागरिकांकडून काढण्यात आलेला मोर्चा याची गंभीर दखल मंत्री गोगावले यांनी बैठकीत घेतली. यावेळी संबंधित दुर्घटनाग्रस्त भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभीच नागरिकांकडून ट्रॉमा केअर मधील गैर सुविधांचा पाढा वाचला. कुंभार आळीमधील नागरिकांकडून या अपघातासंदर्भात व ट्रॉमा केअर मधील गैर सुविधांबाबत स्वतंत्रपणे निवेदन देण्यात आले. यावर ट्रॉमा केअर मध्ये अत्यावश्यक असलेल्या साधनांची उपलब्धता नसेल. तर त्याची माहिती द्यावी. त्याची परिपूर्तता तातडीने केली जाईल, असे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले.

ट्रॉमा केअर मध्ये भुलतज्ज्ञांची असलेली आवश्यकता व त्यांना मिळत असलेल्या मानधनासंदर्भात मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीमध्ये आपण धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती करू, असे गोगावले यांनी सांगितले. रुग्णालयात अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत झालेल्या अपघातात शासनाकडून सर्व ती मदत केली जाईल, अशी ग्वाही गोगावले यांनी दिली.

ट्रॉमा केअर चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शंतनू डोईफोडे यांनी या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणातील उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडून तातडीने अपघातातील संबंधितांवर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच गेल्या महिन्याभरात महिला प्रसूती संदर्भात अहवाल सादर केला. मात्र, नागरिकांमधून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

शासनाकडून मंजूर झालेल्या शंभर खाटांच्या नवीन रुग्णालयाच्या निर्मिती संदर्भात उपाययोजना करताना या चार मजली इमारतीमध्ये बांधकाम करताना परिसरात येणारा महापूर लक्षात घेऊनच त्याची निर्मिती करावी, अशी सूचना माजी नगराध्यक्ष सुनील कवीसकर यांनी केली. ट्रॉमा केअर मध्ये आवश्यक असलेल्या सुविधांची उपलब्धता नसेल, तर त्याचे नाव काढून ठेवावे, अशी मागणी केली असता गोगावले यांनी या संदर्भात तातडीने यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवमाने यांनी आदिवासी रूग्णांसाठी आरोग्यसेवा व ॲम्बुलन्स व्यवस्था करण्याबाबतची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT