नाते : महाड तालुक्याला परतीच्या पावसाने मागील काही दिवसापासून जोरदार झोडपून काढले आहे. शनिवारी (दि.19) सायंकाळी उशिरा झालेल्या पावसात तळोशी रंगू माता मंदिर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली.चालू वर्षी महाड तालुक्यात ४००० मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून आज दुपारनंतर रायगड विभागासह संपूर्ण तालुक्याला पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले.यामुळे संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसले.
रायगड विभागातील प्रसिद्ध असलेल्या तळोशी रंगू माता मंदिर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती येथील नागरिकांकडून मिळाली. मागील अनेक दशकांमध्ये अशा पद्धतीचा पाऊस झाला नसल्याचे जेष्ठ नागरिकांकडून सांगण्यात आले. एकूणच महाड तालुक्यात परतीचा पाऊस बळीराजाला संकटात टाकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उत्तम भात पीक येणार असल्याची चाहूल लागली असतानाच मागील काही दिवसातील परतीच्या पावसामुळे पीकाचे नुकसान शक्यता होत आहे.