MSEDCL Pudhari
रायगड

महाडमध्ये वादळाचे तांडव; महावितरणच्या 'वॉरियर्स'नी ८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शहर उजळले

विस्कळीत झालेला वीजपुरवठा अखेर ८ तासांच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरा पूर्ववत

पुढारी वृत्तसेवा

महाड: शनिवारी (दि.९) दुपारी महाड शहराला बसलेल्या अवकाळी पावसाच्या आणि वादळाच्या तडाख्यानंतर विस्कळीत झालेला वीजपुरवठा अखेर ८ तासांच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरा पूर्ववत झाला. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पावसाची पर्वा न करता 'युद्धपातळीवर' काम करत रात्री १० वाजता शहराचा मुख्य वीजपुरवठा सुरू केला.

झाडे पडल्याने खांब झाले जमीनदोस्त

शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने महाड शहरात एन्ट्री केली. या वादळाचा मोठा फटका नवेनगर, पंचशील नगर, आयटीआय कॉलेज (चांदे ग्राउंड) आणि पीजी सिटी परिसराला बसला. आयटीआय कॉलेजजवळ मोठे झाड पडल्याने उच्चदाब वाहिनीचे (HT Line) दोन खांब कोसळले, तर पंचशील नगरमध्ये झाड पडल्याने लघुदाब वाहिनीचे (LT Line) दोन खांब तुटले. यामुळे शहराचा मोठा भाग अंधारात बुडाला होता.

अधिकारी व कर्मचाऱ्यांची 'फिल्डिंग'

वीजपुरवठा खंडित होताच महावितरणच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहायक अभियंता अनिल भोये यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ निखिल भुरे, नईम शेख, महावितरण कर्मचारी आदेश भालेकर आणि कंत्राटदार अभि जाधव व संग्राम माने यांच्या पथकाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. भरपावसात आणि पडलेली झाडे बाजूला सारत या टीमने सलग ८ तास अहोरात्र मेहनत घेतली. अखेर रात्री १० वाजता आयटीआय कॉलेजजवळील मुख्य लाईनचे पोल उभे करून शहरात पुन्हा वीज धावू लागली.

पंचशील नगरचे काम युद्धपातळीवर सुरू

शहरातील मुख्य वीजपुरवठा पूर्ववत झाला असला, तरी पंचशील नगर येथील लघुदाब वाहिनीचे खांब उभे करण्याचे काम अद्याप सुरू असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली आहे. या भागातील वीजपुरवठाही लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास उपअभियंता अनिल भोये यांनी व्यक्त केला आहे. निसर्गाच्या प्रकोपानंतर जिद्दीने काम करून शहराचा अंधार दूर करणाऱ्या महावितरणच्या या टीमचे महाडकरांकडून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT