महाड : महाड तालुक्याच्या वरंध विभागात रामदास पठार गावातून महाड कडे दुपारी साडेतीन च्या सुमारास येणाऱ्या एसटी ( क्र. एम एच 20 बी एल 38 22 )ब्रेक फेल झाल्याने पलटी झाली. ही घटना वरंध घाटातील बेबीचा गोल येथे घडली. एसटी सुमारे 50 फूट खाली पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये दोन वगळता अन्य प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
गाडीतील जखमी प्रवाशांपैकी काही जणांवर वरंध प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर अन्य प्रवाशांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान या अपघाताचे वृत्त समजतात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी ग्रामीण रुग्णालया भेट देऊन तेथील जखमी प्रवाशांची विचारपूस केली व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डोईफोडे यांना सर्व संबंधितांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील अपघाताचे वृत्त समजतात ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमी ची विचारपूस केली.
यासंदर्भात प्राप्त झालेल्या सविस्तर माहिती नुसार दुपारी दीड वाजता महाड एसटी आगारातून ही गाडी रामदास पठार कडे रवाना झाली होती. परतीच्या प्रवासात सुनेभाऊ येथे एका लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या वरंध परिसरातील लोक गाडीत बसले असल्याचे समजते.
दुपारी साडेतीन च्या सुमारास वरंध घाटामधील पहिल्या वळणावर बेबीचा गोल येथे गाडीचे ब्रेक फेल झाल्याने गाडीचा ताबा सुटून गाडी पलटी झाल्याची माहिती चालक हनुमंत दिघे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितली .
यासंदर्भात रुग्णालयाच्या सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जखमींमध्ये शुभदा सोपान धनावडे वय 65, हनुमंत लक्ष्मण दिघे राहणार माहेरी वय 50 चालक, राजेश नथुराम साळुंखे वय 53 शीरगाव वाहक, काशीबाई ज्ञानदेव जाधव वय 70 रामदास पठार, ज्ञानदेव पांडुरंग जाधव वय 75 रामदास पठार, सुनिता सुरेश चौधरी वय 63 वडघर, साईज्ञा संकेत मालुसरे वय सहा ठाणे, अशा रघुनाथ मालुसरे वय 55 पारमाची, रघुनाथ नारायण मालुसरे वय 58 पारमाची, दगडाबाई दत्ताराम पांडे वय 77 तळीये, तुळशीबाई राजाराम यादव वय 65 तळीये, मंदा हैबत पवार पारमाची, सुवर्णा सुधीर धनावडे वय 45 वरंध, कांचन दिलीप मालुसरे वय 40 पारमाची, सुप्रिया संभाजी धनावडे वय 55 वरंध ,नीलिमा चंद्रकांत पोळ वय 30, अथर्व चंद्रकांत पोळ वय 5 तळीये यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.उपचारार्थ दाखल केले.
या संदर्भात चालक हनुमंत दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार वरंध घाटातील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू असलेल्या कामासंदर्भात संरक्षक कठडे बसविण्यात आल्या नसल्याबाबतची तक्रारीची चौकशी करावी अशी मागणी पारमाची चे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अनिल मालुसरे यांनी नामदार भरत शेठ गोगावले यांच्याकडे केली आहे.