Crime News pudhari photo
रायगड

Mahad Crime : उधारीचे पैसे मागितल्याने दुकानदाराला गंभीर मारहाण; महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दुकानदार एजाझ चिपळुनकर यांच्यावर महाड येथील डॉ. रानडे रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

महाड : मागील उधारीचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका किराणा दुकान मालकाला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याची घटना महाड शहरात घडली आहे. या मारहाणीत दुकानदाराच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी महाड शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळीवाडा नाका येथील मदीना किराणा जनरल स्टोअर्सचे मालक एजाझ मोहीद्दीन चिपळुनकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून त्यानुसार अरबाझ अब्दुल लतीफ काझी (रा. पानसरी मोहल्ला, महाड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

११ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी एजाझ चिपळुनकर हे आपल्या दुकानात आले असताना आरोपीत अरबाझ तेथे आला. जुनी उधारी मागितल्याचा राग मनात धरून त्याने चिपळुनकर यांना कानशिलात लगावून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चिपळुनकर यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली,तसेच आरोपीने दुकानातील साहित्याची तोडफोड करत नुकसान केले, आणि फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

हल्ल्याच्या घटनेनंतर फिर्यादी यांच्या पत्नी शाहीन चिपळुनकर या पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाल्या असता, आरोपी अरबाझ याने त्यांनाही वाटेत अडवून शिवीगाळ करत गैरवर्तन केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. ​दरम्यान, गंभीर जखमी झालेले दुकानदार एजाझ चिपळुनकर यांच्यावर महाड येथील डॉ. रानडे रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT