महाड: खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटू लागले आहेत. या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज (३१ डिसेंबर) महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
या निषेध सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तटकरे यांचे प्रदेशाध्यक्षपद तातडीने काढून घ्यावे, अशी मागणी घोसाळकर यांनी केली.
यावेळी शिवसेनेचे युवा कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या हद्दपारीची मागणी करणाऱ्या शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांच्यावरही कडक टीका करण्यात आली. ओझर्डे यांच्या महिलांसंदर्भातील मागील कृत्यांचा पाढा वाचत, त्यांची महाडमधून हद्दपारी करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यासह निलिमा घोसाळकर (जिल्हाप्रमुख, महिला आघाडी), सुनील कविस्कर (नगराध्यक्ष), सपना मालुसरे (उपजिल्हाप्रमुख), विद्या देसाई (शहर प्रमुख, महिला आघाडी), डॉ. चेतन सुर्वे (शहर प्रमुख) मान्यवर उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी काळोखे हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध केला. हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असून, शासनाने जलदगतीने खटला चालवून आरोपींना फासावर लटकवावे,अशी भावना महिला आघाडीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.