Mahad Poladpur dam project Pudhari
रायगड

Mahad Poladpur dam project: महाड- पोलादपूर तालुक्यातील धरण प्रकल्प रखडले

प्रशासनाचा निष्क्रियपणा व चुकीचे धोरण उघड, नागरिकांचा संताप तीव्र

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: महाड व पोलादपूर तालुक्यातील काळकुंभे, नागेश्वरी, कोथेरी तसेच सवाद- धारवली या महत्त्वाच्या धरण प्रकल्पांची कामे वर्षानुवर्षे रखडल्याने स्थानिक नागरिकांच्या समस्या भीषण स्वरूप धारण करत आहेत. पाणीटंचाई, सिंचनाचा अभाव आणि शेतीचे होत असलेले नुकसान यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, यासाठी थेट प्रशासनाच्या निष्क्रियपणालाच जबाबदार धरले जात आहे.

या प्रकल्पांमुळे परिसरातील शेतीला बळ मिळेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशा अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात प्रकल्पांची अवस्था अर्धवट व दुर्लक्षित असून, अनेक ठिकाणी काम पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून येते. संकटाचा सामना करताना अनेक कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला प्रकल्पांची घोषणा मोठ्या गाजावाजात करण्यात आली; परंतु त्यानंतर कोणतेही ठोस नियोजन, वेळापत्रक किंवा प्रभावी अंमलबजावणी दिसून आलेली नाही. “निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात काम पुढे सरकत नाही. प्रशासकीय यंत्रणा केवळ कागदोपत्री हालचाली करत असून प्रत्यक्षात पूर्णपणे अपयशी ठरली आहे,” असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

स्थानिकांच्या मते, या प्रकल्पांच्या रखडण्यामागे केवळ निधीअभावी समस्या नसून चुकीचे धोरण, समन्वयाचा अभाव आणि जबाबदार अधिकाऱ्यांची उदासीनता हेच प्रमुख कारण आहे. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय घेतले जात नसल्याने प्रशासनावरील विश्वास ढासळत असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांनी तातडीने प्रकल्पांना गती देऊन निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. रखडलेल्या कामांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून पारदर्शकता राखावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

एकूणच, महाड व पोलादपूर तालुक्यातील काळकुंभे, नागेश्वरी, कोथेरी आणि सवादधारवली धरण प्रकल्प रखडल्याने निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, प्रशासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी पावले उचलली नाहीत तर येत्या काळात जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई

विशेषतः उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असून, अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येते. महिलांना व वृद्धांना पाण्यासाठी लांब अंतर पार करावे लागत आहे. यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT