महाड : महाड शहरातील रस्त्यांवर पसरलेल्या खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष खड्ड्यात लोळत आणि जलतरण स्पर्धा घेत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे, आंदोलनातील विजेत्या जलतरणपटूंना चिकन आणि मटणाची बक्षिसे देऊन आंदोलन रंगतदार करण्यात आले.
आंदोलनप्रसंगी शहर अध्यक्ष पराग वडके यांनी प्रशासनातील मनमानीवर तीव्र टीका केली. स्वच्छ महाड, सुंदर महाड ही मोहिम फक्त कागदावर दिसत असून प्रत्यक्षात मात्र शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. जबाबदार अधिकार्यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांची झालेली दुरवस्था, खड्ड्यांचे साम्राज्य आणि नुकत्याच केलेल्या कंत्राटी कामाचा निकृष्ट दर्जा यावर नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. दोन महिन्यांपूर्वी लाखोंच्या खर्चाने केलेले खड्डे बुजवण्याचे हे काम पावसात पूर्णपणे उखडून गेले. परिणामी, सणासुदीत नागरिक आणि गणेशभक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
या आंदोलनात रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सरचिटणीस श्रीहर्ष कांबळे, जिल्हा सदस्य अनयत खान, संघटक अझहर धनसे, महाड शहर अध्यक्ष पराग वडके, तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, विधानसभा अध्यक्ष मुदसिर पटेल, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.