महाडः महाड नगर परिषदेच्या 2 डिसेंबर रोजी 20 नगरसेवकांसाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 23 हजार 124 मतदारांपैकी 16,426 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे याची टक्केवारी 70.1 एवढी झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा ती 2 टक्क्यांनी कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.मतदान कमी होण्याची नेमकी कारणे स्पष्ट होताना दिसत नाही.
दोन डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या महाड नगर परिषदेच्या एकूण मतदारांमध्ये दहा प्रभाग निश्चित करण्यात आले होते यामध्ये प्रत्येकी दोन नगरसेवकांच्या निवडीसाठी नागरिकांनी मतदान केले प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकूण 2412 मतांपैकी 1730 मतदान झाले असून, प्रभाग 2 मध्ये 2691 पैकी 2021, प्रभाग 3 मध्ये 1790 पैकी 1269, प्रभाग 4 मध्ये 2235 पैकी 1979, प्रभाग5 मध्ये 2033 पैकी 1328, प्रभाग 6 मध्ये 2910 पैकी 1788, प्रभाग 7 मध्ये 2670 पैकी 1896, प्रभाग8 मध्ये 1626 पैकी 1256, प्रभाग प्रभाग 9 मध्ये 2189 पैकी 1378 तर प्रभाग 10 मध्ये 2568 पैकी 1781 मिळून 16,426 एवढे मतदान एकूण 23 हजार 124 मतदारां कडून करण्यात आले आहे.
मतदानादरम्यान प्रभाग दोन मध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान मशीन मध्ये झालेल्या बिघाडा पश्चात व त्यानंतर झालेल्या शहरातील हाणामारी पश्चात विविध प्रभागातील किरकोळ बाचाबाची च्या घटना वगळता शहरात सर्वत्र झालेल्या घटनेचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार 2016साली झालेल्या मतदानामध्ये एकूण 20 हजार सात मतदारांपैकी 14,673 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता त्यांची एकूण आकडेवारी 73.34 एवढी होती त्यावेळी 7477 पुरुष तर 7196 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
या तुलनेत 2025 मध्ये नऊ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत एकूण 23,124 मतदारांपैकी 16,426 मतदारांनी हक्क बजावला असून यामध्ये 8166 पुरुष तर 8260 स्त्री मतदारांचा समावेश आहे.
मारामारीचे अन्यत्र परिणाम नाहीत
महाड शहरात दुपारी 1.15 च्या सुमारास मंगळवारी झालेल्या माराहणीचे दृश्य परिणाम शहरांतील अन्य कोणत्याही विभागांमध्ये दिसून आले नाहीत ही घटना घडत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना तातडीने आपल्या प्रभागात जाऊन मतदान प्रक्रियेमध्ये लक्ष देण्याबाबतच्या दिशा निर्देशाचे तंतोतंतपालन संबंधित विभागातील कार्यकर्त्यांनी केल्याचे सायंकाळी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.