Mahad Municipal Election Clash
महाड : महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक २ मधील शाळा क्रमांक ५ बाहेरील मार्गावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी बेपत्ता असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांच्यासह आणखी पाच आरोपींनी शनिवारी (दि.२४) दुपारी सुमारे दोन वाजता महाड शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावून शरणागती पत्करली.
सुशांत जाबरे यांच्यासोबत अमित शिगवण, व्यंकट मंडला, मोहनिश पाल आणि समीर रेवाळे हे पाचही आरोपी पोलिसांसमोर हजर झाले असून, त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व आरोपींना रविवारी महाड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यापूर्वी या प्रकरणात शुक्रवारी विकास गोगावले यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १३ आरोपी पोलिसांसमोर हजर झाले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.
शनिवारी हजर झालेल्या आरोपींची पोलीस ठाण्यात आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया व खातेनिहाय चौकशी सुरू असून, यानंतर न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या शरणागतीमुळे हाणामारी प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. या प्रकरणाशी संबंधित पुढील न्यायालयीन सुनावणी व घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.