Mahad MIDC Pollution Pudhari
रायगड

Mahad MIDC Pollution: महाड एमआयडीसीच्या पाण्यामुळे जुईकरांचे आरोग्य धोक्यात; प्रशासन मात्र गप्प

सांडपाणी साचून डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यू, मलेरियाचा धोका निर्माण

पुढारी वृत्तसेवा

रघुनाथ भागवत

खाडीपट्टा: महाड औद्योगिक विकास महामंडळातील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी आणि दूषित सांडपाण्यामुळे जुई गावासह परिसरातील पर्यावरण धोक्यात आले आहे. पाईपमधून थेट वाहणाऱ्या काळसर पाण्यामुळे नाले-ओढे प्रदूषित झालेत, तीव्र दुर्गंधी पसरली आहे आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. प्रशासनाने वारंवार आश्वासने देऊनही ठोस कारवाई न केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.

काळसर पाणी, काळे भविष्य-स्थानिकांनी दिलेल्या दृश्यांमध्ये एमआयडीसी मधून बाहेर पडणारे संशयास्पद, काळसर रासायनिक सांडपाणी स्पष्ट दिसत आहे. हे पाणी थेट नैसर्गिक नाले आणि ओढ्यांमध्ये मिसळत असून, त्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाणही धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. "दिवसरात्र नाकात विषारी वास, श्वास घेणे मुश्किल झालेय" अशी व्यथा ग्रामस्थ मांडत आहेत.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर- या दूषित पाण्याचा फटका आता नागरिकांच्या आरोग्याला बसू लागला आहे. गेल्या काही महिन्यांत त्वचारोग, ॲलर्जी, डोळ्यांची जळजळ, पोटाचे विकार आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत लक्षणीय वाढ झाली आहे. ग्रामस्थांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली आहे.

सांडपाणी साचून डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यू आणि मलेरियाचा धोका देखील निर्माण झाला आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि जुईकरांना दिलासा देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता संपूर्ण रायगडकरांचे लक्ष लागले आहे."जुई वाचवा, विषारी पाणी बंद करा" - अशी एकच मागणी आज प्रत्येक ग्रामस्थाच्या ओठावर पाहायला मिळत आहे.

आश्वासनांचा पूर, कारवाईचा दुष्काळ

या गंभीर समस्येबाबत जुईचे सरपंच आणि ग्रामस्थांनी वारंवार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदने दिली आहेत. बैठका झाल्या, पाठपुरावा झाला, पण प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे आहे. "केवळ आश्वासने मिळतात, कृती शून्य" असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

स्थानिक ग्रामस्थांच्या ठाम मागण्या

1. दूषित पाण्याचे नमुने तातडीने तपासून वस्तुस्थिती जाहीर करावी

2. प्रदूषणास जबाबदार कंपन्यांवर कठोर कारवाई करावी

3. ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत

4. विषारी सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडणाऱ्यांवर कारवाई करावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT