महाड: महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स कंपनी मॅनेजर जयप्रकाश आनंद शेट्टी यांना ७ सप्टेंबर रोजी बेदम मारहाण करून खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून ९ जणांना अटक करण्यात करण्यात आली असल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.
महाड एमआयडीसी मधील इंडो अमाईन्स या कंपनीमध्ये १५ ऑगस्ट रोजी वायुगळती होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाकडून कंपनी बंद करण्यात आली होती.
जवळपास २५ दिवस कंपनी बंद असल्यामुळे आसनपोई येथील ग्रामस्थ मोठा जमाव करून कंपनीच्या गेटवर गेले. यानंतर जर पुन्हा कंपनी चालू करायची असेल तर आम्हाला पंधरा लाख रुपये द्या अशी मागणी आरोपी करत होते, मात्र कंपनी मॅनेजरने आरोपी यांची कोणतीही मागणी पूर्ण न केल्यामुळे या आरोपींनी कंपनी मॅनेजरला कंपनीतच बेदम मारहाण केली.
याप्रकरणी आरोपी तुकाराम पवार, बळवंत निकम, राजेश गोळे, चंद्रकांत जाधव, मयूर जाधव, राजेश जाधव, भरत जाधव, हनुमंत पवार, चेतन सोनवणे व एक अज्ञात आरोपी सर्व राहणार आसनपोई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
१५ ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेनंतर ७ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांकडून मॅनेजर जयप्रकाश शेट्टी यांच्या माराहाणीच्या घटनेने वायू गळती प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे बोलले जात असून आगामी काळात या संदर्भात ग्रामस्थ कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे