महाड : महाड औद्योगिक वसाहती मधील प्रतीतयश कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुदर्शन कंपनीमध्ये सायंकाळी सव्वा सहा च्या सुमारास झालेल्या क्लोरीन वायूच्या गळतीने एकच परिसरात खळबळ उडाली आहे. पण तातडीच्या केलेल्या उपचारामुळे ते थांबवण्यात यश प्राप्त झाल्याची माहिती सुदर्शन कंपनीच्या व्यवस्थापनाकडून घेण्यात आली आहे या घटनेमुळे कंपनीतील सर्व कामगारांना कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगून कामगार सुरक्षित असल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
स्थानिक पोलीस प्रशासन व यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार कंपनीमधील असलेल्या कामगारांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्याचे प्रयत्न कंपनी व्यवस्थापनाकडून केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास कारखान्यांमध्ये क्लोरीन वायूची गळती झाली. यावेळी कंपनी प्रशासनाने तातडीने सर्व कामगारांना सुरक्षितस्थळी हलवले. काही प्रमाणात वायुगळतीमुळे त्रास झालेल्या तीन ते चार कर्मचाऱ्यांना कंपनीच्या २४ तास उपलब्ध वैद्यकीय सेवा केंद्रातून उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. खबरदारी म्हणून रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आली होती.
या कठीण परिस्थितीत एमआयडीसी पोलीस प्रशासनासह अन्य सर्व यंत्रणांनी सहकार्य केल्याने परिस्थिती लवकर नियंत्रणात आली आणि संभाव्य धोका टळला, अशी माहिती सुदर्शन कंपनी प्रशासनाने दिली.