महाड : श्रीकृष्ण बाळ
ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्या महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण घोषित झाल्यानंतर महाआघाडी विरुद्ध महायुतीच्या सह सदस्यांमध्ये आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये महाड शहरात मनसे, शिवसेना उबाठाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत.
सोमवारी जाहीर झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित केल्याची घोषणा झाल्यानंतर या प्रवर्गातील विविध पक्षांच्या मान्यवरांकडून आपल्या सहकारी मित्रपरिवार संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी यांच्यामार्फत पक्षाच्या नेतृत्वाकडे थेट मागणी करायला सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
महाड नगर परिषदेची मागील सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये घेण्यात आली होती. यावेळी चुरशीच्या झालेल्या लढतीत तत्कालीन काँग्रेसमध्ये असलेल्या स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप कामत यांनी बाजी मारली होती. मात्र या लढतीच्या निकालामध्ये मनसेच्या उमेदवारांनी घेतलेली मते निर्णय ठरल्याचे दिसून आले होते. मागील काही वर्षात महाड शहरातील विविध पक्षात बदल शिवसेनेमध्ये जाणार्या कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात गेल्याने भाजप, उबाठा शिवसेना व मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकार्यांची व मतदारांची या निवडणुकी संदर्भातील असलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भारतीय जनता पक्ष गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा साथीदार पक्ष म्हणून महाड शहरात वावरला आहे मात्र या पक्षासाठी त्यांच्या मागणीनुसार नगरसेवकांची संख्या निवडून आणण्यात आजपर्यंत पक्षाला यश प्राप्त झालेले नाही. सध्या महाडमध्ये असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये असल्याने विरोधी असणार्या उद्धव ठाकरे शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडे या संदर्भात केलेल्या विचारधारानुसार आमची स्वतंत्र भूमिका आज या पहिल्या दिवशी कायम असल्याचे त्यांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले होते.
महाडच्या या भूमीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या लढती करता प्रथमच उतरणार्यांची संख्या लक्षणीय असेल असे मानले जात आहे. यामुळेच मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटामध्ये असली तरीही उर्वरित तीन पक्षांची या दोन्ही पक्षांच्या विजयामध्ये निर्णायक भागीदारी असेल असे स्पष्ट संकेत आज तरी पहावयास मिळत आहेत.