Mahad Crocodile News Pudhari
रायगड

Mahad Crocodile News: कोर्थुडे धरणातील मगरी आल्या रस्त्यावर; पाणीसाठा आटल्याने अधिवासावर परिणाम

सिस्केप संस्थेमार्फत तातडीचे बचाव अभियान पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

नातेः महाड तालुक्यातील कोथुर्डे येथील पाटबंधारे विभागाच्या धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने तेथील मगरींच्या अधिवासावर गंभीर परिणाम झाला आहे. पाण्याअभावी धरणातील मगरी बाहेर पडून गावातील रस्ते, शेत परिसर आणि जंगलात वावरताना दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाड येथील सिस्केप संस्थेने वन विभागाच्या सहकार्याने तातडीचे बचाव अभियान सुरू केले आहे.

महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी नदी तसेच विविध जलाशयांमध्ये मार्श प्रजातीच्या मगरी मोठ्या प्रमाणावर आढळतात. कोथुर्डे येथील धरणातील पाणी महाड शहरासह परिसरातील अनेक गावांना पुरवठा करण्यासाठी वापरले जाते.

मात्र यंदाच्या तीव्र पाणीटंचाईमुळे धरण पूर्णपणे कोरडे पडले असून जलचर जीवसृष्टी संकटात सापडली आहे. पाण्याअभावी मासे मृत्यूमुखी पडत असून मगरींनाही सुरक्षित अधिवासासाठी धरणाबाहेर पडावे लागत आहे.

वनक्षेत्राधिकारी आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री, संस्थेचे सदस्य आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे बचाव मोहीम सुरू केली. योगेश गुरव, चिंतन वैष्णव, चिराग मेहता, ओम शिंदे, धर्मेंद्र मेहता, ओंकार वेलंकर, ओंकार माने यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी मगरी पकडण्यासाठी प्रयत्न केले.

मात्र काही मोठ्या मगरी अत्यंत चपळ आणि शक्तिशाली असल्याने त्या जाळे व दोरखंड तोडून जंगलाच्या दिशेने पसार झाल्या. एका सुमारे 12 फूट लांबीच्या मगरीला पकडण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. बचाव पथकाला काही लहान-मोठ्या मगरी सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले असून उर्वरित मगरींचा शोध सुरू आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मगरी पाण्याबाहेरही दीर्घकाळ जगू शकतात आणि झाडाझुडपांमध्ये आश्रय घेतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धरविशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या मगरींना योग्य गोड्या पाण्याच्या अधिवासात स्थलांतरित करण्यासाठी वन विभाग आणि सिस्केप संस्था प्रयत्नशील असून या संपूर्ण बचाव मोहिमेकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

धरण क्षेत्रात अजूनही 20 मगरींचा वावर

धरण परिसरात सुमारे 27 मगरींचा वावर असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून समोर आले आहे. चापगाव मार्ग, कोतुर्डे आदिवासीवाडी, बौद्धवाडी, धरणवाडी आणि मुळगाव परिसरात अनेक मगरी ग्रामस्थांच्या नजरेस पडल्या. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर मगरी दिसू लागल्याने नागरिकांनी तत्काळ वन विभाग आणि सिस्केप संस्थेशी संपर्क साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT