Mahad News File photo
रायगड

Mahad News: औद्योगिक क्षेत्रांतील वायू गळतीचा मानवी वस्त्यांवर परिणाम?

अपघातांनंतरच्या परिणामांचा अभ्यास व्हावा; महाडमधील घटनेबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची स्थानिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: भारतीय स्वतंत्रता दिनाच्या दिवशी महाड औद्योगिक वसाहत परिसरात असणाऱ्या इंडो अमायन्स कंपनीमध्ये झालेल्या वायू गळतीच्या संभाव्य धोक्याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेचे गांभीर्य आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती स्थानिक नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे अशा अपघातांनंतर मानवी वस्ती व पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास व्हावा, अशी मागणी होत आहे.

महाडमध्ये झालेल्या दुर्घटनेने औद्योगिक परिसरातील असणाऱ्या नागरी वस्तीमध्ये या घटनांबाबतची जनजागृती करण्याकरिता शासनाने पुढाकार घेणे आवश्यक असताना देखील आजपर्यंत अशा पद्धतीच्या जनजागृती मोहिमा दुर्दैवाने महाड परिसरात घेतला गेल्या नसल्याने नागरिकांमधून शासनाने याबाबत गंभीरपणे विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कंपनी परिसरातून वायू गळती झाल्यास त्याचा आसपासच्या मानवी वस्त्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासनाने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

वायू गळतीच्या घटनांमध्ये संबंधित वायूच्या प्रकारानुसार डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे यांसारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. काही विषारी किंवा ज्वलनशील वायूंची गळती झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

त्यामुळे अशा घटनांच्या वेळी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, घराबाहेर पडावे की घरातच सुरक्षित ठिकाणी थांबावे, आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन आवश्यक आहे.

मात्र, वसाहत परिसरातील अनेक ग्रामस्थांना वायू गळतीच्या धोक्याचे स्वरूप, त्याचे संभाव्य परिणाम आणि आपत्कालीन उपाययोजनांची पुरेशी माहिती नसल्याचे चित्र आहे. कंपनीकडून नियमितपणे सुरक्षा जनजागृती कार्यक्रम, आपत्कालीन सराव आणि ग्रामस्थांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनी परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास तिची माहिती नागरिकांपर्यंत तातडीने आणि अधिकृत माध्यमातून पोहोचणे आवश्यक आहे. अफवा किंवा अपुऱ्या माहितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते.

त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने वायू गळतीची कारणे, संबंधित वायूचा प्रकार, त्याची तीव्रता, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आखण्यात आलेली योजना याबाबत पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, स्थानिक प्रशासनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणांकडून माहिती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, आरोग्य विभाग आणि कंपनी प्रशासन यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित स्थलांतर, वैद्यकीय मदत आणि नागरिकांना सूचना देण्यासाठी प्रभावी यंत्रणा तयार ठेवण्याची गरज आहे.

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापन व प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन परिस्थिती स्पष्ट करावी, तसेच वायू गळतीसंदर्भातील सुरक्षा उपायांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी जोर धरत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने भूमिका स्पष्ट करून ग्रामस्थांच्या मनातील संभ्रम दूर करावा आणि भविष्यात अशा घटना घडल्यास त्याचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अपघातांची अधिकृत माहिती द्या...

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनी परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास तिची माहिती नागरिकांपर्यंत तातडीने आणि अधिकृत माध्यमातून पोहोचणे आवश्यक आहे. अफवा किंवा अपुऱ्या माहितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते.

त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने वायू गळतीची कारणे, संबंधित वायूचा प्रकार, त्याची तीव्रता, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आखण्यात आलेली योजना याबाबत पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. स्थानिक प्रशासनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणांकडून माहिती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT