महाड: तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे शुक्रवारी (दि. १९) रात्री एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील चार नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये धोंडू तांबडे, सनी खेडेकर, मालती पवार व आणखी एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले; मात्र रेबीज प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने सर्व जखमींना पहाटे तीनच्या सुमारास सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवावे लागले. त्यामुळे महाड ग्रामीण रुग्णालयाच्या गैरसुविधांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच, शिरगांव ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी महाड ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व अपुरी सुविधा असल्याबद्दल आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयाच्या इन्चार्ज डॉ. वटर्स यांना त्यांनी कुलूप व चावी भेट दिली आणि लवकरच आवश्यक सेवा उपलब्ध न झाल्यास रुग्णालय बंद करण्याचा इशारा दिला.
सरपंच ओझर्डे यांनी रुग्णालयाच्या फक्त इमारतीवर भर दिला जात असल्याचे, तर प्रत्यक्ष वैद्यकीय अधिकारी, औषधसाठा व सेवा याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. त्यांनी शासनाला तातडीने महाड ट्रॉमा केअरमधील अत्यावश्यक रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यास आणि पर्याप्त औषधसाठा उपलब्ध करून देण्यास सांगितले.