महाड शहराची ग्रामदेवता देवी जाखमाता भाविकांचे श्रद्धास्थान  pudhari photo
रायगड

Mahad Jakhamata Devi temple : महाड शहराची ग्रामदेवता देवी जाखमाता भाविकांचे श्रद्धास्थान

नानासाहेब पेशव्यांच्या काळात हेमाडपंथीय मंदिरात झालेली देवीची स्थापना

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

देवी जाखमाता महाड शहराची ग्रामदेवता आहे. पुरातन काळापासून ते अगदी शिवकाळापर्यंत या देवीच्या अस्तित्वाच्या खुणा आजही महाडमध्ये सापडतात. खरं तर कोकणात अऩेक ठिकाणी जाखमाता देवीची मंदिरेही आहेत. जाखडी या कोकणातील पारंपरीक नृत्य कलेच्या नावाशी साधर्म्य असलेला शब्द जखडणे या शब्दाच्या व्युत्पत्तीतून आला आहे, त्यामुळे भक्तांशी घट्ट नाते सांगणारी ही देवी असू शकते असा तर्क लावला जातो.

तत्कालीन जाखडी नृत्य करणारा वर्ग या देवीची म्हणजेच या शक्तीची पूजा करणारा असावा असाही तर्क काढता येतो. पण याला तसा कागदोपत्री पुरावा नाही. पण आजही या देवीचे महात्म्य भक्तांच्या रोजच्या येण्याने अधोरेखीत झाला आहे असे जरूर म्हणावे लागेल.

महाडमधील हे जाखमातेचं पाषाणरुपी देवस्थान महाडच्या इतिलासकालीन कोट किल्ल्याच्या पूर्वेच्या प्रवेशद्वारापाशीच आहे. हेमांडपंथीय बांधकाम असलेल्या छोट्याशा मंदिराभोवती सभामंडप घातल्याने या मंदिराचे भव्य स्वरूप दिसते. तसं जाखमाता हे यक्षिणीचा अवतार असल्याने व्यापारी वर्गाची ही देवी असंही हिला संबोधले जाते. आणि तसा पुरावा म्हणजे पुरातन वैश्यवाणी या व्यापार करणा-या समाजातील अऩेक कुटुंबांची ही कुलदैवत आहे. आणि व्यापार आणि महाड शहर हेही नाते पुरातनच आहे.

महाबळेश्वरच्या एका आर्थर पाईंट या घाटमाथ्यावरून उगम पावलेली सावित्री नदी ही घाट आणि कोकण यांच्यातील व्यापा-याची साक्षीदार आहे. याच नदीला मधुनदी म्हणजेच रिव्हर ऑफ हनी असे ब्रिटीशकाळात म्हणायचे. घाटमाथ्यावरील मधाचा व्यापार या नदीतून कोकणात व्हायचा. आणि महाड हे बंदर याच सावित्रीच्या समुद्रपातळीवरच्या काठावर वसले आहे. महाड हा शब्द महाहाट याच शब्दापासून म्हणजे मोठी बाजारपेठ असा अर्थाने रूढ झाला आहे. 1638 मध्ये आलेल्या डी कॅस्ट्रो या फ्रेंच प्रवाशाने देशातील गव्हाची फार मोठी उलाढाल महाडच्या या बंदरातून होत होती अशी नोंद केलेली आहे.

महाडची ही जाखमाता महाडचे ग्रामदैवत विरेश्वर महाराजांची बहीण असून विन्हेरेची झोलाई, महाडची कोटेश्वरी या बहिणी असल्याचे सांगितले जातात. त्याचा प्रत्यय महाशिवरात्रीच्या छबिना या उत्सवात दिसून येतो. देव, देवस्थान या संज्ञा दिवसेंदिवस डिजीटल युगामुळे पडद्याआड होताना दिसत असल्या तरी त्या देवांचे नातेसंबंध व त्यातून निर्माण झालेले उत्सव या गोष्टी खुपच कुतुहलाच्या आणि आश्चर्यकारक असतात. अनेकजण वेळप्रसंगी नास्तीकाचा मुखवटा घालून वावरल्यामुळे या कुतुहलाच्या रंजक कथांचा त्यांना उलगडा होत नाही.

  • नवरात्रीच्या घटस्थापनेच्या सकाळी गुरव देवीचा मुखवटा आणतात. आणि साडी चोळी नेसवून तिची विधीवत स्थापना होते. गुरव गावाच्या सुखसमृद्धीचे गा-हाणे देवीसमोर मांडतो आणि जाखमातेचं चांगभलं म्हणत देवीची स्थापना होऊन आरती केली जाते. विरेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना झाल्यापासून ट्रस्टचे सरपंच व पंच कमिटी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. नानासाहेब पेशव्यांच्या काळात यशवंतराव पोतनीस हें रायगडाचे सुभेदार होते. त्यांनी विरेश्नर मंदिराच्या जिर्णोद्धाराबरोबरच हेमांडपंथीय मंदिरात जाखमातेची स्थापना केली.

  • पाषाणरूपी या जाखमातेची नित्य पूजा केली जाते. काही वर्षापूर्वी जाखमाता नवरात्र उत्सव मंडळाने वर्षभर देवीचा मुखवटा बसवून एक परिवर्तनाची सुरूवात केली. तशी या देवीने परिवर्तनास परवानगी दिल्याचे अनेक दाखले आहेत. आज दिसणारे मंदिरवजा सभामंडप हे याच परिवर्तनाचा एक भाग आहे. करवा कुटुंबातील एका सधन महिलेने या देवळासमोर चालणारी रेडा कापण्याची प्रथेविरूद्ध ग्रामस्थांशी चर्चा करून ही प्रथा बंद करा मी सभामंडप बांधून देते असा विचार मांडला. हा विचार एक सामाजिक बदल होता. तो बदल म्हणजेच परिवर्तन... देवी जाखमातेने मान्य केला असेच म्हणावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT