Mahad Anti Litter Campaign Pudhari
रायगड

Mahad Anti Litter Campaign: शिरगाव-दादली पूल परिसरात कचरा टाकणाऱ्यांचे 'फलकबाजी'तून कान टोचणी

स्वामी समर्थ मंदिराकडे जाणाऱ्या दादली पूल परिसरात काही नागरिकांकडून सातत्याने कचरा टाकला जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती.

पुढारी वृत्तसेवा

वरंध: महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्वच्छतेबाबत एक आगळावेगळा उपक्रम राबवत कचरा टाकणाऱ्या नागरिकांना अनोख्या पद्धतीने जाणीव करून दिली आहे. स्वामी समर्थ मंदिराकडे जाणाऱ्या दादली पूल परिसरात काही नागरिकांकडून सातत्याने कचरा टाकला जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती.

त्यामुळे दुर्गंधी पसरून परिसराचे सौंदर्यही खराब होत होते. वारंवार सूचना, जनजागृती आणि विनंत्या करूनही काही नागरिकांकडून ही कृती सुरूच असल्याने ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढवत या ठिकाणी जनजागृतीपर फलक लावले आहेत.

या फलकांवर"येथे कचरा टाकणार, मी गाढव आहे" असा ठळक मजकूर लिहिण्यात आला असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे चपराक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या संदेशामुळे नागरिकांचे लक्ष वेधले जात असून, कचरा टाकण्यापूर्वी संबंधित व्यक्ती दोनदा विचार करेल, अशी अपेक्षा ग्रा.पं.ने व्यक्त केली आहे. ग्रा.पं.ने यापूर्वी अनेक वेळा नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली होती.

तसेच कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मात्र काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्याने शेवटी अशा पद्धतीचे फलक लावण्यात आले आहे.

या उपक्रमाचे अरविंद नगर परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून, अशा प्रकारचे फलक इतर सार्वजनिक ठिकाणीही लावावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. स्वच्छ आणि सुंदर गाव घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखून सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता ग्रा.पं. ला सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT