महाड महाप्रलयाच्या कटू आठवणी चार वर्षानंतरही जाग्या pudhari photo
रायगड

Mahad floods painful memories : महाड महाप्रलयाच्या कटू आठवणी चार वर्षानंतरही जाग्या

तळीयेवासियांनी गमावले 87 जणांचे प्राण, कोट्यवधींची हानी

पुढारी वृत्तसेवा
महाड ः श्रीकृष्ण बाळ

2021 वर्षातील 22- 23 जुलै रोजी प्रामुख्याने 22 जुलैला रात्री उशिरा झालेल्या नैसर्गिक दुर्घटनेमध्ये तळीये कोंढाळकर कोंड येथील 87 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेबरोबरच न भूतो अशा पद्धतीचा महाप्रलय महाड सह पोलादपूर व परिसरातील अनेक गावांना तसेच औद्योगिक वसाहतींना कोट्यवधी रुपयांचा फटका देऊन गेला त् या कटू आठवणींचा आज चौथा वर्धापन दिन असून या आठवणी आजही महाडकर नागरिकांना ताज्या राहिल्या आहेत.

गेल्या 24 तासात महाडमध्ये सुरू झालेल्या पर्जन्यवृष्टीने चार वर्षांपूर्वीच्या या कटू आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला असून शासनाने आगामी पाच दिवसात दिलेला रेड अलर्ट व 24 जुलै रोजी येणारी गटारी अमावस्या या दिवशी तिथीने 2016 साली सावित्री पूल दुर्घटना घडली होती . या सर्व आठवणी महाडकर नागरिकांना पुन्हा त्या जागृत करणार्‍या ठरल्या आहेत.

22 जुलै सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या पर्जन्यवृष्टीने हाहाकार माजवीत रात्री उशिरा महाडमध्ये गेल्या शंभर वर्षातील सर्वाधिक 14 फुटापेक्षा जास्त पाण्याने उंची गाठून संपूर्ण महाड शहर पोलादपूर व परिसरातील नदीपात्राजवळची गावे पाण्याखाली गेली होती . सुदैवाने महाड पोलादपूर शहरात जीवित हानी झाली नव्हती मात्र औद्योगिक वसाहती मधील 40 पेक्षा जास्त कारखान्यांमध्ये या महापुराचे पाणी शिरल्याने शंभर कोटी पेक्षा जास्त चे आर्थिक नुकसान या कारखानदारांना सहन करावे लागले होते.

दोन दिवसानंतर शासकीय स्तरावरून करण्यात आलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे यामध्ये स्थानिक तत्कालीन आमदार भरत शेठ गोगावले तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पनवेल मुंबई येथून आणलेल्या अद्ययावत यंत्रसामुग्रीमुळे चवदार तळे कोटेश्वरी तळे वीरेश्वर तळ्यासह शहरातील स्वच्छता मोहिमे करता दिलेले योगदान महाडकर नागरिक कधीही विसरणार नाहीत.

तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे , खासदार सुनील तटकरे , आ.अनिकेत तटकरे यांनी रोहा कोलाड माणगाव या परिसरातून हजारो नागरिक कार्यकर्ते घेऊन महाड मधील नागरिकांना केलेले सहकार्य तसेच म्हसळे श्रीवर्धन मधील मुस्लिम समाजाने देखील यादरम्यान केलेली अर्थपूर्ण व अन्न सेवेची मदत महाडकर नागरिकांना आपल्या या संकटाच्या काळात ताकद देणारी ठरली.

सुदैवाने महाड मधील विविध विभागातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी छोट्या घरांतून असलेल्या आपल्या समाज बांधव भगिनींना रात्री उशिरा स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेली मदत व त्या पश्चात शासनाकडून सामाजिक यंत्रणेकडून विविध राजकीय पक्ष संस्थेकडून प्राप्त झालेल्या अन्नपुरवठ्याने महाड शहर केवळ 78 तासात पुन्हा एकदा दिमाखाने उभे राहिल्याचे सुखद अनुभव या नागरिकांनी अनुभवला. या दोन दिवसात महाड मधील संपर्क यंत्रणा वीज यंत्रणा पाणीपुरवठा हा पूर्णपणे विस्कळीत झाला होता.

संबंधित यंत्रणांकडून युद्धपातळीवर करण्यात आलेल्या उपाय योजनेमुळे आठ दिवसाच्या आत शहरासह ग्रामीण भागातील जनतेला या अत्यावश्यक असलेल्या सोयी सुविधांचा पुन्हा नियमित पुरवठा करण्यात यंत्रणा यशस्वी ठरल्या होत्या.

या महाप्रलयाची गंभीर दखल राज्य व केंद्र शासनाने घेऊन महाडकर नागरिकांची नदीपात्रातील गाळ काढण्याची मागणी तातडीने मंजूर झाली होती त्या पश्चात मागील चार वर्षात महाड शहरात 2024 रोजी मागील दहा वर्षातील सर्वाधिक 4100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस होऊनही महाडकारांना महापुराचा सामना करावा लागला नव्हता यामुळे व्यापारी तसेच औद्योगिक वसाहती मधील कारखानदारांना देखील या आपत्ती मधून सुटका मिळाली होती.

संकटाशी सामना करण्याचे मिळाले सामर्थ्य

  • येणार्‍या कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी स्थानिक तसेच जिल्हा प्रशासन दक्ष असले तरीही महाडकर नागरिकांमध्ये अशा संकटांना सामोरे जाण्याची निर्माण झालेली मानसिकता व धैर्य यांचा राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून तसेच प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आलेले कौतुक तेवढेच महत्त्वपूर्ण ठरले आहे.

  • आजवरच्या महाडच्या महापुराच्या इतिहासात नागरिकांना कोणत्याही साथीच्या आजाराला अशा महाप्रलयानंतर सामोरे जावे लागलेले नाही यावरूनच अशा संकटांना सामोरे जाण्याची मानसिकता व त्यासाठी आवश्यक असलेली करावयाची कामेबाबत महाडकर नागरिक सक्षमपणे स्थानिक प्रशासनाच्या बरोबर कार्यरत असल्याचे दिसून येते म्हणूनच चार वर्षांपूर्वीच्या या कटू आठवणी मागे टाकून नव्याने महाडकर नागरिक औद्योगिक वसाहती मधील कारखानदार व्यापारी बांधव पुन्हा एकदा आपल्या आयुष्यातील नवीन ध्येयाच्या पूर्ततेसाठी सिद्ध झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT