Highway Damage Pudhari
रायगड

Highway Damage: महापुरानंतर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; साईडपट्टीची धूप

महामार्गावर वाहून आली खडी-माती; दरडीही कोसळल्‍या; एमआडीसी पाईपलाईनमुळे महामार्गाला धोका

पुढारी वृत्तसेवा

रघुनाथ भागवत

खाडीपट्टा: गेल्या आठवड्यात झालेल्या महापुराचा फटका महाड तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला बसला आहे. शिरगाव फाटा ते म्हाप्रळ दरम्यान महापुराच्या पाण्यासोबत खडी आणि माती वाहून येऊन महामार्गाची साईड पट्टी जॅम झाली होती.

सद्यस्थितीला जेसीबीच्या सहाय्याने माती आणि खडी बाजूला करण्यात आली असली, तरी याला जबाबदार महाड महाड औद्योगिक विकास महामंडळाची सुरू असलेली सांडपाण्याची पाईपलाईन असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे दोन पदरीकरणाचे काम सुरू असतानाच, याच मार्गाच्या लगत महाड औद्योगिक विकास महामंडळातील रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या एका-दोन वर्षापासून सुरू आहे.

पाईपलाईनसाठी केलेल्या खोदकामातील खड्ड्यांमध्ये पुराचे पाणी साचल्याने महामार्गाच्या साईड पट्टीची मोठी धूप झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी खडी, माती आणि चिखल थेट महामार्गावर वाहून आला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, "महामार्गाचे डांबरीकरण होण्यापूर्वीच महाड औद्योगिक विकास महामंडळाची पाईपलाईन टाकणे गरजेचे होते. मात्र उलटे काम झाल्याने नव्या रस्त्यालाच धोका निर्माण झाला आहे. खोदकामामुळे जमिनीची झीज वाढली असून महापुरात त्याचाच फटका बसला.

महामार्गावर अनेक ठिकाणी पाईपलाईनची मोठी पाईप्स साईड पट्टीवरच उघड्यावर ठेवण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने एखादे वाहन त्याला धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर महापुरामुळे या मार्गावरील आजूबाजूच्या डोंगरांमधून छोट्या-छोट्या माती महामार्गावर येण्याच्या दरडीही कोसळल्या आहेत.

महामार्गाची सुरक्षितता सुनिश्चित करावी

दरम्यान, राजेवाडी फाटा ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्ग दोन पदरी करण्याचे काम गेली ६ वर्षे रखडले आहे. अशातच महाड औद्योगिक विकास महामंडळाची पाईपलाईन आणि त्यानंतर आलेला महापूर यामुळे नुकतेच झालेले रस्त्याचे कामही धोक्यात येऊ शकते.

"नवीन रस्ता होण्यापूर्वीच तो खड्ड्यात जाऊ नये यासाठी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून पाईपलाईनचे काम पूर्ण करावे आणि महामार्गाची सुरक्षितता सुनिश्चित करावी" अशी मागणी प्रवासी आणि स्थानिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT