महाड ः महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान 2 डिसेंबरला झालेल्या शाळा क्रमांक पाच येथे असलेल्या प्रभाग दोन व तीन मतदान केंद्राबाहेरील रस्त्यावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी संदर्भात संबंधित दोन्ही गटातील म्हणजेच विकास गोगावले, सुशांत जाभरेसह एकुण 29 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज माणगाव कोर्टाने फेटाळल्याची माहिती माणगाव न्यायालयातील सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी दिली आहे.
या संदर्भात दोन्ही गटांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर माणगावच्या जिल्हा व्यतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडे या प्रकरणाची चौकशी मागील दोन आठवड्यापासून सुरू होती. आज या संदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर सरकारी वकील आणि केलेल्या युक्तिवाद विचारात घेऊन सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांनी दोन्ही गटातील आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत असल्याचे जाहीर केले.
यासंदर्भात सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने सुनावणी संदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपण सत्र न्यायाधीशांसमोर केलेला युक्तिवादामध्ये सदरचा गुन्हा प्राथमिक तपासासाठी घेण्यात आला असल्याचे सांगीतले. शिवाय सर्व आरोपी फरार असल्याचे नमूद केले. सुप्रीम कोर्टाचे या संदर्भात असलेले निर्देश न्यायाधीशांसमोर ठेवून न्यायालयापासून संबंधित आरोपी दूर असून यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपींपैकी केवळ दोन आरोपीच या निवडणुकीसाठी मतदार म्हणून पात्र होते. अन्य आरोपी बाहेरचे होते, असे सांगून लोकशाहीमध्ये या दिवशी दहशत निर्माण होऊन मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचे त्याने नमूद केले या घटने संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दोन निकालांचा दाखला त्यांनी न्यायालयात सादर केला.