महाड : महाड एमआयडीसी पोलिसांनी पुन्हा एकदा आसनपोई गावच्या हद्दीतील डीझोन प्लॉट नंबर 14 सविती केमिकल कंपनीवर छापा टाकला. तेथील उत्पादित केलेल्या मालाचे पोलिसांनी नमुने घेतले आहेत.
महाड एमआयडीसीतील छोट्या कारखान्यांमध्ये करोडो रुपयांचा ड्रग्ज येतो कुठून असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे. काही दिवसांपूर्वी महाड एमआयडीसीतील रोहन केमिकल या कंपनीवर छापा टाकून सुमारे 89 करोड रुपयाचा ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केला होता. सदरची घटना ताजी असतानाच आज महाड एमआयडीसी पोलिसांनी पुन्हा एकदा आसनपोई गावच्या हद्दीतील डीझोन प्लॉट नंबर 14 सविती केमिकल कंपनीवर छापा टाकला. या कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया करणारे सुरक्षा साधन दिसून आले नाही तसेच अग्निरोधक उपकरणे देखील आढळली नाहीत.
कंपनीचे मालक एवढ्यावरच न थांबता या कंपनीतून निघणारे रासायनिक युक्त सांडपाणी हे जवळच्या नाल्यामध्ये सोडण्यात आले व सोडण्यात आलेले सांडपाणी शेजारी असलेल्या सावित्री पात्रात शिरल्याने शेजारी राहणार्या मानवी आरोग्यास धोका निर्माण केल्यामुळे संबंधित मालकावर भारतीय न्याय संहिता कलम 270, 271, 279, 289 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय यशवंत धुमाळ, वय 60 वर्ष, राहणार, अथर्व वेद सोसायटी, मंत्री पार्क जवळ कोथरूड, पुणे असे आरोपीचे नाव असून आरोपी मालक व कामगार यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
कंपनीमध्ये उत्पादन केलेला मुद्देमालाचे नमुने पोलिसांनी घेतले असून मुंबई कलिना येथील प्रयोग विश्लेषक रासायनिक प्रयोगशाळा येथे सदरचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत. सदरची कारवाई महाड एमआयडीसी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.
महाड एमआयडीसीतील लहान व बंद कंपन्यांमध्ये करोडो रुपयांचा ड्रग्स येतो कुठून असा प्रश्न देखील आता सर्वसामान्यांना पडला आहे. पोलीस नाईक इकबाल शेख यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे फौजदारी तक्रार दाखल केली असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंढे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.