महाड: महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याचे पाणी शुद्ध करून नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी मंत्री भरत गोगावले यांनी स्वतः अमृतसर येथे जाऊन सुवर्ण मंदिर तलावाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा अभ्यास केला.
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चवदार तळे पाणी शुद्धीकरण प्रकल्प व परिसर सुशोभीकरणासाठी 55.80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
या अंतर्गत अमृतसर येथील सुवर्ण मंदिर तलावाचे पाणी ज्या आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने शुद्ध केले जाते, त्याच धर्तीवर महाडमधील चवदार तळ्याचे पाणी शुद्ध करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या दौऱ्यात एमआयडीसीचे उपअभियंता देशमुख, शहर अभियंता कदम, प्रकल्प सल्लागार भोसले तसेच कंपनीचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.
पर्यटनदृष्ट्या आकर्षण केंद्र
चवदार तळ्याचे महत्त्व जपत त्याचे संवर्धन होणार असून, भविष्यात महाडकरांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महाडच्या वैभवशाली ऐतिहासिक असे चवदार तळे या प्रकल्पामुळे तळ्याचे जतन व सुशोभीकरण होऊन ते पर्यटन दृष्ट्याही आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याचा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला.