महाड : महाडसह कोकणातील जनतेला अत्यंत जवळचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणार्या राष्ट्रीय महामार्ग 965 महाड-भोर हा मार्ग एक जूनपासून 31 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीकरता पूर्णतः बंद करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.
या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की उपविभागीय अधिकारी भोर तहसीलदार भोर व पोलिस निरीक्षक भोर पोलिस स्टेशन यांच्याकडून मागवण्यात आलेल्या अहवालामध्ये या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर असून सदरचे क्षेत्र दरड प्रवण क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दरडी कोसळल्यामुळे होणार्या दुर्घटना टाळण्यासाठी हा मार्ग एक जून ते 31 सप्टेंबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद राहील, असे नमूद केले आहे. या कालावधीत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा लाल इशारा दिल्यास हा मार्ग बंद करावा भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट अथवा ऑरेंज दिला नसल्यास सदरचा घाट मार्ग हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुले राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिवृष्टी व दरड कोसळल्यामुळे नैसर्गिक आपत्ती होऊन जीवित हानी होण्याचा धोका लक्षात घेऊन या काळात हा मार्ग बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या दरम्यान नागरिकांनी व पर्यटकांनी पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव निजामपूर तामिळी घाट मुळशी पिरंगुट पुणे व कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर महाबळेश्वर वाई, सातारा, कराड या मार्गाचा अवलंब करावा, असे निर्देशित केले आहे.