रायगड

Raigad lepard attack| महाड तालुक्यात बिबट्याची दहशत; दोन जनावरे केली फस्त...

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

​महाड : तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, आता बिबट्याने आपला मोर्चा पाळीव प्राण्यांकडे वळवला आहे. शिवथर विभागातील चेराववाडी गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन कालवडींचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी चेराववाडी येथील शेतकरी गणपत गायकवाड यांनी आपली गुरे नेहमीप्रमाणे सकाळी चरण्यासाठी सोडली होती.

गावाशेजारील जंगलाच्या परिसरात ही गुरे चरत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक गुरांच्या कळपावर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात बिबट्याने दोन कालवडींना आपली शिकार बनवले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी पठाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी करून पंचनामा केला. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे. "वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा," अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गणपत गायकवाड यांनी केली आहे.

महाड तालुक्यातील विविध विभागांमध्ये सध्या बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडल्याने शेतात जाणेही कठीण झाले आहे. चेराववाडीतील ही घटना वस्तीच्या जवळ घडल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे आता धोक्याचे झाले आहे. वनविभागाने या भागात गस्त वाढवून पिंजरा लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT