Raigad News Pudhari Photo
रायगड

Leh-Manali road block: लेह-मनाली मार्गावर दरड कोसळली; महाडचे ९ पर्यटक कडाक्याच्या थंडीत अडकले

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण द बाळ इलियास ढोकले

महाड : लेह-मनाली राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, यामध्ये महाडमधील तीन कुटुंबांतील ९ पर्यटक गेल्या दोन दिवसांपासून अडकून पडले आहेत. उणे २ अंश सेल्सिअस तापमानात अन्न, पाणी आणि निवाऱ्याशिवाय त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, मदतीसाठी त्यांची धडपड सुरू आहे.

अडकलेल्या पर्यटकांमध्ये महाड शहरातील अमोल महामुणकर, समीर सावंत, राजेंद्र दरेकर आणि त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे. हे सर्वजण पर्यटनासाठी लेह येथे गेले होते, मात्र परतीच्या प्रवासात दरड कोसळल्याने ते रस्त्यातच अडकले.

"सध्या येथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे," अशी माहिती अडकलेल्यांपैकी अमोल महामुणकर यांनी फोनवरून दिली. ते म्हणाले, "कडाक्याच्या थंडीमुळे तापमान २ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. आमच्यासोबत लहान मुले आणि महिलाही आहेत. दोन दिवसांपासून अन्न-पाण्याविना आमचे हाल होत आहेत."

लेह-मनाली महामार्गावर सतत दरडी कोसळत आहेत. प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे, परंतु हवामान खराब असल्याने आणि सतत नवीन दरडी कोसळत असल्याने मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत. रस्ता नेमका कधी मोकळा होईल, याचा कोणताही निश्चित अंदाज नसल्याने पर्यटकांच्या चिंतेत भर पडली आहे. अन्न, पाणी, औषधे आणि गरम कपड्यांअभावी प्रवाशांची स्थिती चिंताजनक बनली आहे.

प्रशासनाला मदतीचे आवाहन

अडकलेल्या पर्यटकांनी प्रशासनाकडे तातडीने मदत पोहोचवण्याची कळकळीची विनंती केली आहे. या घटनेमुळे महाडमधील त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, सर्वजण ते सुखरूप परतण्याची प्रार्थना करत आहेत. प्रशासनाच्या मदतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT