Raigad News Ambenali Ghat Landslide
पोलादपूर : पोलादपूर - महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावर आलेले दगड, गोटे व माती काढण्याच्या कामासाठी दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 पर्यंत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे, याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. सद्य स्थितीत या मार्गावर आलेली दरड व माती बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड व तहसिलदार पोलादपूर यांनी केलेल्या विनंतीनुसार दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रस्ता बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सुचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूर-माणगाव, ताम्हाणी मार्गे पुणे-सातारा व पोलादपूर-चिपळूण-पाटण-सातारा-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
गुरुवारी (दि.१०) पोलादपूर तालुक्यातील पायटा गावाच्या पुढे आंबेनळी घाटात मातीचा ओसरा खाली आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी पोलादपूर तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. गुरुवारी रात्री या मार्गावरील काही प्रमाणात माती बाजूला करण्यात आली होती. मात्र संपूर्ण माती बाजूला करण्यासाठी शुक्रवारी सकाळी पासून युद्ध पातळीवर माती काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी श्री काळभैरवनाथ रेस्क्यू व नरवीर रेस्क्यू पोलादपूर यांच्या समवेत पोलादपूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रावडे याच्या उपस्थिती मध्ये दरड बाजूला करण्यात येत आहे.