लाडक्‍या बहिणींची संक्रात होणार गोड, मंत्री गोगावलेंची घोषणा Pudhari Photo
रायगड

लाडक्‍या बहिणींची संक्रात होणार गोड, मंत्री गोगावलेंची घोषणा

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्यावर विचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

नाते : महायुतीचे सरकार आणण्यात लाडल्या बहिणींचा वाटा मोठा आहे. या लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घेण्याबरोबरच या योजनेची रक्कम वाढविण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांनी पाचाड येथे बोलताना दिली.

     राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा 426 वा जयंती सोहोळा आज पाचाड येथे साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

 या कार्यक्रमाला ना. भरतशेठ गोगावले यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळ राऊळ ,  विजय सावंत, सुरेश महाडिक, बंधू तरडे , संजय कचरे, गटविकास अधिकारी डॉ. स्मीता पाटील, सरपंच सीमा बेदुंगडे, स्वराज्य संग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे अनंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ मॉसाहेब  यांच्या समाधीस्थळी ना. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते राजमातेच्या मूर्तीला मंत्रोच्चारात अभिषेक घालण्यात आला आणि पूजन करुन राष्ट्रमातेला वंदन करण्यात आले. यावेळेस नवयुग विद्यापिठ ट्रस्टच्या विद्याथ्यांचे ढोल ताशा पथकाचे वादन आणि लेझीम पथकाने खेळाचे प्रात्यक्षिक झाले.

    त्यानंतर पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सभागृहात सभा घेण्यात आली. यावेळेस बोलताना गोगावले म्हणाले की, आज आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देतो. ती तीर्थक्षेत्रे टिकवून ठेवण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांच्या पोटी जन्म घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणूनच जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रायगड , पाचाडची वारी करायला हवी असे ते म्हणाले.

पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्याची डागडुजी व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाला प्रतिवर्षापेक्षा बहुसंख्येने शिवभक्त उपस्थित राहिल्याचे यावेळी दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT