tourist spots in Raigad
जिल्ह्यामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर pudhari photo
रायगड

Raigad Tourist Spots | रायगडातील पर्यटन स्थळांवर सोयीसुविधांचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

रायगड : पोहण्याच्या ठिकाणी संरक्षक जाळी नसणे..., लाईफ गार्डची कमतरता..., धोक्याची सूचना देणारे सायरनची वाणवा..., प्रकाश व्यवस्था नसणे..., सुरक्षाव्यवस्थेचा उडालेला बोजवारा..., या बाबींसह इतर सोयी-सुविधांची कमतरता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर असल्याचे विदारक चित्र दिसून येते. जिल्ह्यातील प्रमुख व्यवसायांपैकी एक असलेल्या पर्टनस्थळांचा विकास प्रशासनाच्या अनास्थेमुळे रखडला आहे. यामुळे पर्यटनस्थळांवर येणार्या पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई-ठाण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारे, धबधबे, गड-किल्ले, धार्मिक स्थळे, धरणे यांसह इतर पर्यटनस्थळांवर लाखो पर्यटक हजेरी लावतात. मात्र पर्यटनस्थळांच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पर्यटकांच्या विविध सोयी-सुविधांचा अभाव पर्यटकांना भेडसावत आहे.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत दर वर्षी जिल्ह्यात येणार्या पर्यटकांची संख्या लक्षात घेतली तर ती किती तरी अधिक आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत जिल्ह्यात पाच हजारांहून हॉटेल, लॉज आणि निवास न्याहरी केंद्रे उभी राहिली आहेत. पण ज्या प्रमाणात पर्यटकांची आणि हॉटेलची संख्या वाढते आहे त्या प्रमाणात पर्यटनस्थळांचा विकास झाला नसल्याचे चित्र दिसून येते. यामुळे त्याचा परिणाम भविष्यात पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

60 पर्यटनस्थळांवर गर्दी

जिल्ह्यात जवळपास 60 पर्यटनस्थळांवर पर्यटक गर्दी करतात. मात्र यामधील बहुतांश पर्यटनस्थळांवर सोयी-सुविधांचा अभाव आहे. जिल्ह्यात 20 हून अधिक समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र केवळ 5 समुद्रकिनार्यांवर लाईफ गार्ड तैनात असतात. तर 3 समुद्रकिनार्यांवर पोहण्याच्या ठिकाणी संरक्षक जाळी आहे. 60 पर्यटनस्थळांपैकी 2 पर्यटनस्थळांवर धोक्याची सूचना देणारे सायरन आहेत. केवळ 3 पर्यटनस्थळांवर पोलिस चौक्या आहेत. धोक्याची सूचना देणारे फलक 13 पर्यटनस्थळी बसविण्यात आले आहेत. 15 पर्यटनस्थळावंर रात्री प्रकाशव्यवस्था नसल्याची माहिती उजेडात आली आहे.

लाईफ गार्ड नेमलेले असलेली पर्यटनस्थळे - काशिद, मुरुड, अलिबाग, वरसोली, नागाव ही आहेत. धोक्याच्या सूचनांचे माहिती फलक लावलेली पर्यटनस्थळांमध्ये रेवदंडा, फणसाड, उमटे, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, माथेरान, काशिद, मुरुड, जंजिरा, अलिबाग, वरसोली, नागाव यांचा समावेश आहे. ध

ोक्याची सूचना देणारे सायरन असलेली पर्यटनस्थळांमध्ये अलिबाग, झेनिथ धबधबा यांचा समावेश आहे. मांडवा, वरसोली (सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 2 पोलिस कार्यरत), अलिबाग बीच (सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 2 पोलिस कार्यरत) येथे पोलिस चौकी आहे. पोहण्याच्या ठिकाणी संरक्षक जाळी असलेली अलिबाग, वरसोली, नागाव, झेनिथ ही पर्यटनस्थळे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णवाहिका माहिती देणारे फलक लावलेली पर्यटन स्थळे 17 आहेत. पोलिस ठाणे व आपत्कालीन कक्ष माहिती देणारे फलक लावलेली 14 पर्यटनस्थळे आहेत.

स्थानिक प्रशासनावर मोठी जबाबदारी

जिल्हा प्रशासनाने काही धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घातली असली तरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक पर्यटनासाठी आपल्या माहितीतील निर्जन स्थळी धबधबे आणि धरणांवर वर्षासहलीसाठी जाताना दिसत आहेत. या पर्यटन स्थळांवर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसतात. स्थानिक पातळीवरील प्रशासनावरच या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी असते.

SCROLL FOR NEXT