महाड (रायगड) : श्रीकृष्ण बाळ
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय कामगारांच्या प्रश्नाला योग्य वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या महाड तालुक्यातील बिरवाडी येथील कामगार नेते व तत्कालीन इंटकचे संस्थापक अध्यक्ष गं. द. आंबेकर यांच्या महाड औद्योगिक वसाहती मधील स्मारकाच्या संदर्भात करण्यात आलेल्या मागणीकडे शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्ष बद्दल कामगार वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत असून आंबेकर यांच्या स्मारकाची कामगार वर्गाला आजही प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
महाड औद्योगिक वसाहती लगत असलेल्या ऐतिहासिक बिरवाडी गावात गं.द. आंबेकर यांचे बालपण गेले. पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे गेल्यानंतर तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होऊन त्यांनी भरीव योगदान दिले स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना जागतिक व्यासपीठावरील कामगारांसंदर्भातील एका विशेष बैठकी करता भारताचे प्रतिनिधित्व करण्याची विनंती केली होती.
स्वातंत्र्योत्तर कामगार वर्गासाठी स्थापन करण्यात आलेल्या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. तत्कालीन काळामध्ये मुंबई व परिसरामध्ये असलेल्या गिरणीतील कामगारांसाठी त्यांनी केलेले अनमोल योगदान कामगार पिढीने स्मरणात ठेवले. म्हाडा औद्योगिक वसाहत १९९० च्या दशकात अखेरी सुरू झाल्यानंतर मागील तीन दशकात अनेक वेळा महाडमध्ये आलेल्या उद्योग मंत्र्यांकडे या म्हणीय कामगार नेत्याची आठवण पुढील पिढीला व कामगार वर्गाला राहावी या उद्देशाने त्यांचे उचित स्मारक उभारून त्यामधून कामगार वर्गासाठी मार्गदर्शन शिबिरे व त्यांच्या कुटुंबीयां करिता विशेष उपक्रमांचे आयोजन केले जावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाड औद्योगिक वसाहती मध्ये कार्यरत असलेल्या कामगार संघटनांकडून त्यांच्या स्मृतिदिनी देखील त्यांच्या संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन दुर्दैवाने केले जात नाही बिरवाडी गावातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेला गं. द. आंबेकर यांचे नाव देण्यात आले असून माजी मंत्री व इंटरचे नेते सचिन भाऊ अहिर यांनी या ठिकाणी अनेक वेळा येऊन त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेला गं. द. आंबेकर यांचा पुतळा उभारण्याकामी त्यांनी भरीव योगदान दिल्याची माहिती बिरवाडी ग्रामस्थांकडून देण्यात आली. या शाळांतून शिकणाऱ्या हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्याच गावातील या देशभरातील कामगारांकरता दिलेल्या योगदानाच्या नेतृत्वाची महती प्रतिवर्षी शाळांतून होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते.
मात्र लगतच्या कामगार वसाहतीला त्यांचे नाव देण्याचा अथवा त्यांच्या नावाने स्मारक उभारून त्यामध्ये कामगारांना आवश्यक असणाऱ्या संशोधनात्मक मार्गदर्शनाचा करिता शासनाकडून अथवा कामगार मंत्रालयाकडून आज पावतो कोणतीही कार्यवाही दुर्दैवाने झालेली नाही याबद्दल कामगार वर्गात शासनाविरोधात तीव्र नाराजीयुक्त संताप व्यक्त होत आहे. राज्याच्या राजधानीतील एका मार्गाला शासनाने त्यांचे नाव देऊन त्यांचा उचित गौरव करण्याचा केलेला प्रयत्न वगळता त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक भव्य
स्वरूपात व्हावे अशी बिरवाडी ग्रामस्थ तसेच कामगार वर्गातून आग्रही मागणी शासनाला केली जात आहे.
रायगड जिल्हयात आज लाखो कामगार विविध कारखाने आणि आस्थापनांमध्ये काम करती आहेत. अनेक कामगारांना त्याचे हक्क आणि त्यांना योग्य सोयी सुविधा मिळत नाहीत. याचबरोबर असंघटित कामगारामुळे त्यांच्या प्रश्नांना शासन स्तरावर लक्ष दिले जात नाही असे सांगितले जाते. त्यामुळे कामगाराच्या हितासाठी, त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कामगार वर्गासंदर्भात जाणीवपूर्व आकस
दुर्दैवाने कामगार वर्गात महाड येथे असलेल्या कामगार मंडळाला देखील स्वतंत्र इमारत आजपर्यंत प्राप्त झालेली नाही याचाच अर्थ शासनाकडून कामगार वर्गाच्या संदर्भात असलेला जाणीवपूर्व आकस दिसून येत असून ज्या नेत्यांनी कामगारांकरिता आपले सर्वस्व अर्पण केले त्यांचे त्यांच्या जन्म गावी मागील तीन दशकांपासून अपेक्षित असलेले भव्य स्मारक आजही निर्मितीच्या प्रतीक्षेत आहे.