जयंत धुळप
रायगड: कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही सागरी जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (एमएमबी) आणि खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून प्रवासी जलवाहतुकीला मोठी चालना मिळाली आहे.
मुंबईला कोकणाशी जोडणारे कॅटमरान, वॉटर टॅक्सी, रो-रो सेवा आणि पारंपरिक लाँच सेवांमुळे प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. गेल्या वर्षभरात (पर्यटन हंगामात) काेकणात ९३ लाख पर्यटक व प्रवाशांनी जलमार्गावरील सेवेचा लाभ घेतला.
केवळ पर्यटनातून ५० काेटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर प्रवासी तिकिटांमधून खासगी ऑपरेटर्सची झालेली एकूण उलाढाल सुमारे १५० कोटींपेक्षा जास्त आहे. अशाप्रकारे एकूण महसूल २०० काेटी रुपयांच्या घरात आहे.
रायगड जिल्हा हा जलवाहतुकीच्या बाबतीत कोकणातील सर्वात व्यस्त जिल्हा ठरला आहे. मुंबईहून अलिबाग आणि मुरुडकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे या मार्गांवर वर्षभर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. सर्व जलमार्गांचा गेल्या वर्षभरात ५० लाख प्रवाशांनी लाभ घेतला.
रो-रो सेवेचे विशेष आकर्षण
भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान चालणाऱ्या एम-टू-एम रो-रो बाेट सेवेने मुंबई व अलिबागमधील प्रवासाचे अंतर अवघ्या ५० ते ५५ मिनिटांत पूर्ण होतो. या सेवेने आतापर्यंत १५ लाखांहून अधिक प्रवाशांची यशस्वी वाहतूक केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील जलवाहतूक
घोडबंदर ते जेशिका (वसई मार्ग जोडणी), कोलशेत (ठाणे) ते साकेत आणि उरण-बेलापूर ते भाऊचा धक्का या प्रवासी सेवा आहेत. १० लाख प्रवाशांनी लाभ घेतला असून, ५.५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
पालघर जिल्ह्यातील जलवाहतूक
वसई ते भाईंदर (रो-रो सेवा), डहाणू ते जव्हार/स्थानिक खाडी मार्ग आणि सातपाटी व केळवे येथील अंतर्गत मार्ग यांचा यामध्ये समावेश आहे. १५ लाख प्रवाशांनी वाहनांसह प्रवास केला असून, ७.५ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी वाहतूक
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १५ लाख प्रवाशांनी लाभ घेतला असून, ९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळे अंतर्गत खाडी मार्ग असे जलमार्ग आहेत. १२ लाख पर्यटक व प्रवाशांनी येथे भेट दिली व त्यातून सुमारे ५ काेटी रुपयांचा महसूल मिळाला.