नौका किनाऱ्यावर ; मासेमारी उद्योग ठप्प pudhari photo
रायगड

Raigad News : नौका किनाऱ्यावर ; मासेमारी उद्योग ठप्प

किनाऱ्यावरील वादळाच्या सावटाचा परिणाम; अर्थचक्रावर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

दापोली : प्रवीण शिंदे

कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा वादळाचे सावट दाटले असून, जोरदार वाऱ्यांमुळे आणि उंच लाटांमुळे खोल समुद्रात जाणाऱ्या हजारो मासेमारी नौका आता किनाऱ्याच्या आश्रयाला उभ्या आहेत. परिणामी संपूर्ण मासेमारी उद्योग ठप्प झाला असून, रोजची कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे तर किनारपट्टीचे अर्थकारण अक्षरशः डळमळीत झाले आहे.

महाराष्ट्रासुमारे 720 कि. मी. लांबीची समुद्रकिनारीपट्टी लाभली असून, त्यावर सुमारे 17 हजार मासेमारी बोटी नोंदणीकृत आहेत. यापैकी 13 हजार बोटी या यंत्रसंचालित आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील किनारे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या वादळाच्या इशाऱ्यामुळे सर्वच बंदरांवर बोटींच्या रांगा लागल्या आहेत.

हर्णे, आंजर्ले, बुरोंडी, मुरूड, पाज, देवगड, विजयदुर्ग या किनाऱ्यांवर हजारो नौका ठप्प आहेत. समुद्रकिनारे बोटींच्या गर्दीने गजबजले असले तरी वातावरणात भीतीचे सावट पसरले आहे. मच्छीमार, चालक, कामगार आणि व्यापाराशी निगडित हजारो हात सध्या बेरोजगार झाले आहेत.

मासेमारी बंद असल्याने बाजारात मासळीचा पुरवठा घटला आहे. परिणामी स्थानिक बाजारात मासळीचे दर चढण्याची शक्यता आहे. बर्फ कारखाने, कोल्ड स्टोरेज, वाहतूकदार आणि प्रक्रिया उद्योग यांच्यावरही मंदीचे सावट आले आहे.

प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला असून, हवामान विभागाने वादळाचा इशारा कायम ठेवला आहे. हवामान स्थिर झाल्यावरच मासेमारी पुन्हा सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, किनाऱ्यावर ठप्प झालेल्या बोटींचे दृश्य पाहून कोकणातील अर्थकारणाला बसलेला झटका स्पष्ट जाणवतो आहे.

वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाची हजेरी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीचा पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, दुपारी 3 च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र एकच धावपळ झाली. शेतकऱ्यांकडून भात कापणी सुरू आहे मात्र पावसामुळे पुन्हा काम थांबवावे लागले. कापलेले भातावर ताडपत्री टाकण्यात आली. काही ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या भात पिकांना फटका बसला आहे.

कोकणात चार महिने धो-धो पाऊस बरसला. नद्याने इशारा, धोक्याची पातळी ओलांडली होती. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नंतर ऑक्टोबर महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर हिटमुळे रत्नागिरीकर अक्षरशा वैतागले होते.

उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. काही दिवसापासून वातावरणात बदल होत असून मागील बुधवारी अवकाळी पावसामुळे तालुक्यात मोठे नुकसान केले. त्यानंतर दिवाळीत ही परतीच्या पावसाने हजेरी लावली. एकीकडे जिल्ह्यात 70 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली असून काही प्रमाणात भात कापणीला आला होता. ऑक्टोबर महिना संपत आला तरी रत्नागिरीसह राज्यात परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान, परतीचा पाऊस अद्याप पूर्णपणे थांबलेला नसून पुढील 1 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम असणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT