Konkan migratory birds Pudhari
रायगड

जागतिक स्थलांतरीत पक्षी दिन विशेष: कोकणातील निसर्गसमृद्धीमुळे पाच प्रमुख स्थलांतरीत पक्ष्यांचा कायमस्वरूपी मुक्का

'पाहुणे' झाले 'घरधनी'!

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड: कोकणची समृद्ध जैवविविधता, पोषक हवामान आणि मुबलक अन्नसाठ्यामुळे निसर्गचक्रात एक सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळी केवळ हिवाळ्यापुरते पाहुणे म्हणून येणारे अनेक स्थलांतरित पक्षी आता कोकणाचे 'कायमचे रहिवासी' झाले आहेत. 

प्रामुख्याने आर्द्र जमीन आणि खाडी परिसरात या पक्ष्यांनी आपले बस्तान बसवले असून, हे कोकणातील पर्यावरणाच्या संपन्नतेचे प्रतीक मानले जात आहे. जागतीक स्थलांतरीत पक्षी दिनानिमीत्ताने ज्येष्ठ पक्षी अभ्यासक आणि 'सिस्केप' या संस्थेचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना या महत्त्वपूर्ण बदलाची माहिती दिली. मेस्त्री यांच्या निरीक्षणातून प्रामुख्याने पाच पक्षी आता कोकणात स्थळनिवासी झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोकणात स्थायिक झालेले प्रमुख 'पाच' पक्षी

१. चक्रवाक (Brahminy Duck):

उत्तर भारतातून हिवाळ्यात येणारा हा देखणा पक्षी आता कोकणातील धरणे आणि खाडी परिसरात वर्षभर वास्तव्यास असतो. मुळचा हा युरेशीया, तिबेट आणि लढाक मध्ये वास्तव्य करणारा पक्षी आहे.

२. उघड्या चोचीचा करकोचा (Asian Openbill Stork):

पूर्वी केवळ विणीच्या हंगामापुरता मर्यादित असलेला हा पक्षी आता रायगड आणि रत्नागिरीतील जलसाठ्यांजवळ स्वतःच्या कायमस्वरूपी वसाहती करून राहू लागला आहे. हा मुळचा तमीळनाडू आणि आध्रप्रदेशातील पक्षी आहे.

३. पांढऱ्या मानेचा करकोचा (Woolly-necked Stork):

नद्यांचे किनारे आणि भातशेतीमध्ये हा पक्षी आता कायमचा स्थिरावला आहे. तो आता 'स्थानिक स्थलांतरित' न राहता 'स्थानिक निवासी' गटात सामील झाला आहे. मुळचा ताे गुजरात,मध्येप्रदेश,आेरीसा, राजस्थान मधील आहेत.

४. रोहित पक्षी (Flamingo):

नवी मुंबई आणि उरणच्या खाडीत येणाऱ्या फ्लेमिंगोपैकी अनेक तरुण पक्षी आता परतीच्या प्रवासाला न जाता वर्षभर येथेच मुक्काम ठोकतात. मात्र, यंदा त्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट जाणवत आहे. मुळचे हे पक्षी आॅस्ट्रेलीया मधील असून कच्छमधून काेकणात येत असतात.

५. शराटी (Ibis):

काळा शराटी (Glossy Ibis) आणि पांढरा शराटी (Black-headed Ibis) हे पक्षी आता कोकणातील दलदलीच्या भागाचे हक्काचे रहिवासी बनले आहेत. हे पक्षी देखील मुळचे महाराष्ट्रातील नसून ते जामनगर गुजरात मधील आहेत.

परदेशी पाहुणे येथेच का स्थिरावले?

पक्षी अभ्यासकांच्या मते, या बदलामागे काही महत्त्वाची भौगोलिक आणि पर्यावरणीय कारणे आहेत. त्यामध्ये कोकणातील खाड्यांमध्ये मिळणारे मासे, खेकडे आणि भातशेतीतील कीटक पक्ष्यांसाठी पोषक ठरत आहेत. काेकणातील दमट आणि समशीतोष्ण हवामान या पक्ष्यांच्या शरीरयष्टीला मानवणारे आहे.खारफुटीची जंगले आणि मानवी हस्तक्षेप कमी असलेले खाडी किनारे पक्ष्यांना सुरक्षित वाटत आहेत.

समृद्धी टिकवून ठेवणे गरजेचे

कोकणचा निसर्ग केवळ पर्यटकांनाच नाही, तर स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांनाही भुरळ घालत असल्याचे यावरून अधोरेखित होत आहे. मात्र, ही समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी खाडी आणि खारफुटीचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

कोकणातील बदलत्या हवामानानुसार आणि येथील जैवविविधतेच्या समृद्धीमुळे अनेक 'हिवाळी पाहुणे पक्षी' आता कोकणाचे 'कायमचे रहिवासी' होत आहेत. पक्षी निरीक्षकांच्या नोंदी या बदलावर शिक्कामोर्तब करत आहेत.
- प्रेमसागर मेस्त्री, संस्थापक, सिस्केप संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT