विन्हेरे : रविवारी (दि.१५) दुपार नंतर कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेनंतर या मार्गावर दोन रेल्वे थांबविण्यात आल्या होत्या. दोन्ही रेल्वेमधील सुमारे २०० पेक्षा जास्त प्रवाशांना महाड एसटी आगारातून चिपळूण खेड व पनवेल येथे रात्री उशिरा सोडण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली. Konkan Railway
माहितीनुसार, विन्हेरे ते दिवानखवटी दरम्यान खेड हद्दीमध्ये दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली. महाड तालुक्यातील विन्हेरे रेल्वे स्थानकावर नागरकोईल गांधीधाम एक्सप्रेस व करंजाडी रेल्वे स्थानकावर तिरुवनंत पुरम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या रेल्वे दुपार पासून थांबलेल्या होत्या. प्रवाशांना पोलीस व महसूल प्रशासनामार्फत चहा नाष्टा अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली.
तसेच दरड हटविण्याचे कामास वेळ लागणार असल्याने खेड, चिपळूण, रत्नागिरीकडे जाणारे प्रवासी यांना जाण्याकरिता एसटी महामंडळामार्फत बसेस उपलबद्ध करून देण्यात आल्या. उर्वरित प्रवासीसह दोन्ही रेल्वेगाड्या पनवेलकडे परत रवाना झाल्या.
महाड एसटी आगारातून रात्री साडेबारा वाजता तीन गाड्या करंजाडी रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी पाठविण्यात आल्या त्यामधून एक गाडी खेड येथे, दोन गाड्या चिपळूणला व एक गाडी महाड एसटी आगारातून पनवेल येथे रवाना झाल्याची माहिती एसटी आगार व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान महाडच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. महाडमध्ये काल १९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, आज पावतो १३५७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.