रायगड ः कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता आरपारची लढाई लढली जाणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सक्रिय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष ऊर्फ बापू नेमळेकर यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला असून, येत्या महाराष्ट्र दिन 1 मे 2026 पासून बेमुदत उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
प्रलंबित मागण्या आणि प्रशासनाचे दुर्लक्ष कोकण रेल्वेच्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अनेकवेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्यासोबत या आंदोलनात कोकणातील विविध प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
आंदोलनाचे मुख्य मुद्दे आणि मागण्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पाच प्रमुख मागण्यां असून त्याकडे लक्ष वेधण्याकरिता हे आंदोलन करण्यात येणार आहे. या मागण्यामध्ये, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पूर्णतः भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे, जेणेकरून प्रवाशांना इतर झोनप्रमाणे सवलती आणि सुविधा मिळतील.
रेल्वेसाठी जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांच्या प्रलंबित वारस नोकरीच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढावा.कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर वंदे भारत, राजधानी आणि इतर सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा. रेल्वे स्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकते जिने तातडीने कार्यान्वित करावेत.वारंवार उशिराने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे होणारे हाल थांबवून वेळापत्रकात सुधारणा करावी यांचा समावेश आहे.
मे महिना हा कोकणात पर्यटनाचा आणि गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा हंगाम असतो. याच काळात जर उपोषण आंदोलन झाले, तर त्याचा मोठा फटका रेल्वे प्रशासनाला आणि पर्यायाने प्रवाशांना बसू शकतो. आता 1 मे पूर्वी रेल्वे प्रशासन यावर काय ठोस निर्णय घेते, याकडे संपूर्ण कोकणवासियांचे लक्ष लागले आहे.