कोकणवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याची आणि अगदी र्हदयातच स्थान असलेल्या कोकण रेल्वेमार्गाच्या सध्याच्या एकेरी असलेल्या मार्गाचे दुहेरीकरण होणार असल्याने कोकणवासीय चाकरमान्यांचा गावी जाण्याचा प्रवास गतिमान होणार आहे. कोकण रेल्वे मार्ग सध्या एकेरी असल्यामुळे अनेक वेळा गाड्यांचे वेळापत्रक बिघडते आणि प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाने या रेल्वे मार्गाचे टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गाड्यांची संख्या दुपटीने वाढून प्रवास अधिक गतीशील व सोयीचा होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
गेल्या वीस वर्षांत कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली असली, तरी गाड्यांची संख्या मात्र त्या प्रमाणात वाढलेली नाही. परिणामी कोकणात आपल्या गावी जाणार्या आणि गावांहून मुंबईस येणार्या प्रवाशांना नेहमीच प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागतो. कोकण रेल्वेचा रोहा ते ठोकुर असा एकूण 739 किमीचा हा रेल्वेमार्ग आहे.
यातील रायगड जिल्ह्यातील रोहा ते वीर या 46.8 किमी टप्प्याचे दुहेरीकरण ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण झाले आहे. मात्र त्यानंतर दुहेरीकरणाच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. ती आता मिळणार असल्याने कोकणवासीयांचा प्रवास येत्या दोन ते तिन वर्षात सुखकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोकण मार्गावरून 2024-25मध्ये 26 हजार 266 गाड्या धावल्या. त्यामध्ये 20 हजार 056 प्रवासी गाड्या तर 6 हजार 170 मालगाड्यांचा समावेश होता. सद्यस्थितीत दररोज सरासरी 55 प्रवासी गाड्या आणि 17 मालगाड्या धावतात.
1. सिग्नल आणि क्रॉसिंग करिता रेल्वेगाड्यांना होणार विलंब टळणार.
2. सिंगल लाईन कॉसिंगचा मुद्दा निकाली निघणार
3. परिणामी प्रवासी वेळेत मोठी बचत होवून,प्रवास गतिमान होणार
4. पावसाळा वा आपत्कालिन परिस्थितीत सध्या एकच लाईन असल्याने एकामागे एक गाड्या अडकून पडतात, दुहेरीकरणानंतर अन्य लाईनचा वापर करणे शक्य होणार.
5. प्रवासी गाड्याच्या संख्येत वाढ करणे शक्य
6. कोकण रेल्वेची मालवाहतूक विशेषतः रो-रो सवेत वाढ होवून आर्थिक उत्पन्नात विक्रमी वाढ शक्य.