Konkan Water Conservation pudhari photo
रायगड

Konkan Water Conservation : थेंब अन् थेंब वाचवण्यासाठी कोकण एकवटले

कोकणातील पाच जिल्ह्यांत लोकसहभागातून १२ हजारांहून अधिक वनराई बंधारे

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

दरवर्षी मुसळधार पाऊस पडूनही डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे वाहून समुद्राला जाऊन मिळणारे पाणी अडवण्यासाठी यंदा संपूर्ण कोकण विभागात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेने लोकचळवळीचे रूप धारण केले आहे. रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, कृषी व वन विभाग तसेच स्वयंसेवी संस्थांच्या उत्स्फूर्त श्रमदानातून आतापर्यंत १२ हजारांहून अधिक वनराई आणि विजय बंधारे उभारले गेले आहेत.

दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याने या मोहिमेत मोठी आघाडी घेतली असून, येथे १० हजारांहून अधिक बंधाऱ्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ‘मिशन बंधारे’ अंतर्गत एकाच दिवशी हजारो बंधाऱ्यांची उभारणी करत आतापर्यंत ६,५०१ हून अधिक बंधारे पूर्ण झाले आहेत. रत्नागिरीमध्ये पारंपरिक वनराई बंधाऱ्यांसोबतच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘विजय बंधारे’ तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करून पाणी गळती पूर्णपणे रोखली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा १० हजार वनराई बंधारे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सप्टेंबर अखेर अणाव येथून या विशेष जलसंवर्धन मोहिमेला सुरुवात झाली असून, सर्व तालुक्यांतील ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागातून आतापर्यंत ४,५०० हून अधिक बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. उरलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गावागावांत अखंड श्रमदान सुरू आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, तळा, महाड, पोलादपूर आणि सुधागड यांसारख्या टंचाईग्रस्त तालुक्यांतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने विशेष लोकचळवळ उभी केली आहे. प्रत्येक गावात ५ ते १० बंधारे बांधण्याच्या नियोजनातून पहिल्याच टप्प्यात अवघ्या पाच दिवसांत २०० हून अधिक बंधारे पूर्ण करण्यात आले असून, या वेगवान कार्यपद्धतीची राज्य मंत्रिमंडळातही विशेष दखल घेण्यात आली आहे. रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी या बंधारे उभारणीच्या कामची प्रत्यक्ष पहाणी करुन ग्रामस्थांचा प्रशंसा केली आहे.

पालघर जिल्ह्यात साकारले १,२०० हून अधिक बंधारे

fपालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी पट्ट्यातील संभाव्य उन्हाळी टंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जलसंवर्धन आराखड्यांतर्गत २ हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या समन्वयातून आतापर्यंत १,२०० हून अधिक बंधारे पूर्ण झाले असून उर्वरित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

ठाणे जिल्ह्यात ३०० हून अधिक बंधाऱ्यांची कामे पूर्ण

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ओढे आणि नाल्यांवर कृषी विभाग, वन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायत स्तरावर बंधारे उभारणीची मोहीम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले असून, नाल्यांमध्ये वाहते पाणी असेपर्यंत म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत या मोहिमेत आणखी भर पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT