Konkan Monsoon Birds Pudhari
रायगड

Konkan Monsoon Birds: शेतकऱ्यांचे मित्र! कोकणातील पावसाळी पक्षी

पारंपरिक निसर्ग संकेत देत सर्वत्र झाले सक्रीय

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड: कोकणात पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूप पूर्णपणे बदलते. चहुबाजूला पसरलेली हिरवळ, वाहणारे झरे आणि ढगाळ वातावरण यामुळे अनेक स्थलांतरित पक्षी विणीच्या हंगामासाठी कोकणात येतात, तर स्थानिक पक्षीही या काळात अधिक सक्रिय होतात.

कोकणातील या प्रमुख 'पावसाळी पक्षी' गटामध्ये चातक, नवरंग, कस्तूर, पावशा, सुगरण, करकोचा आणि बगळे या सात पक्षांचा समावेश होतो, अशी माहिती ज्येष्ठ पक्षी अभ्यासक व 'सिस्केप' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी दैनिक पुढारी शी बाेलताना दिली.

पावसाळ्यात कीटकांची संख्या प्रचंड वाढते, जे या पक्षांच्या पिलांसाठी उत्तम अन्न असते. भातपिकाला धोका पोहोचवणाऱ्या कीटकांचा नाश करत असल्याने हे सर्व पक्षी 'शेतकऱ्यांचे मित्र' म्हणून ओळखले जातात.

चातक हा कोकणातील पावसाळ्याचा खरा दूत मानला जातो. हा आफ्रिकेतून मान्सूनच्या वाऱ्यांसोबत भारतात येतो. काळ्या-पांढऱ्या रंगाचा आणि डोक्यावर तुरा असलेला हा पक्षी "पियू..पियू.." असा ओरडतो.

दंतकथांनुसार, हा पक्षी जमिनीवरचे पाणी पिण्याऐवजी थेट ढगातून पडणारे पावसाचे थेंब पितो. यामुळेच एखाद्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहण्यासाठी 'चातकासारखी वाट पाहणे' हा मराठी वाक्प्रचार रूढ झाला आहे. कोकिळेप्रमाणे चातक स्वतःचे घरटे बांधत नाही; तो आपली अंडी अन्य पक्षांच्या घरट्यात घालतो.

नवरंग हा पक्षी नावाप्रमाणेच नऊ वेगवेगळ्या गडद रंगांनी सजलेला असतो. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याचे कोकणात आगमन होते. हा मुख्यत्वे जमिनीवर वावरणारा लाजाळू पक्षी असून दाट झुडपांमध्ये लपून राहतो. पावसाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी याचा "व्हिट-टीयुव..." असा शिटीसारखा दुहेरी आवाज जंगलात लांबून ऐकू येतो. सुकलेली पाने उकरून त्याखालील किडे, अळ्या आणि गांडूळ शोधून खाणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

कस्तूर (Malabar Whistling Thrush) याला स्थानिक भाषेत "शिट्या चोर" किंवा आनंदी पक्षी म्हणतात. गडद निळ्या-काळ्या रंगाचा हा पक्षी पावसाळ्यात अतिशय आनंदी असतो आणि मानवी आवाजासारखी हुबेहूब सुमधुर शिटी वाजवतो. झऱ्यांमधील लहान खेकडे, गोगलगायी आणि कीटक हे त्याचे मुख्य अन्न आहे.

पावसाळा जवळ आला की पावशा (Brainfever Bird)पक्षाचा पेरते व्हा...असा चढत्या पाढ्याचा आवाज सतत ऐकू येतो. याचा आवाज शेतकऱ्यांना शेतीच्या कामाला लागण्याचा संदेश देतो. स्वतःचे घरटे न बांधता आपली अंडी दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात चोरून घालतो. सुगरण पक्षी वर्षभर कोकणात असतो, पण त्याचा खरा उत्साह पावसाळ्यात दिसतो.

उघड्या चोचीचा करकोचा (Asian Openbill Stork), कोकणातील बगळा (Egret) आणि ढोक (Heron) यांचे शेतकऱ्यांबरोबर अतूट नाते आहे. जमिनीतून निघणारे किडे व अळ्या ते खातात.

पावसाळ्यात कीटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते, आणि हेच कीटक या पक्षांच्या पिलांसाठी उत्तम अन्न असते. म्हणूनच काेकणात बहुतांश पक्षी याच काळात अंडी घालतात आणि आपली वंशवृद्धी करतात. काेकणात पावसाळी पक्षी म्हणून आेळखळे जाणारे हे सर्व पक्षी शेतकऱ्यांचे मित्र असतात, कारण भातपीकाला धाेका पाेहाेचवणाऱ्या किटकांचाचा हे पक्षी नाष करत असतात.पावसाळी पक्षी केवळ कोकणच्या निसर्गाचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर कीटकांचा नाश करून पर्यावरण आणि शेतीचा समतोल राखण्यात मोलाची भूमिका बजावतात.
- प्रेमसागर मेस्त्री, जेष्ठ पक्षी अभ्यास तथा संस्थापक, सिस्केप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT