अलिबाग, श्रीवर्धन : पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार 25 ते 29 ऑक्टोबर अशा पाच दिवसांच्या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहाण्याची शक्यता आहे.
परिणामी कोकण किनारपट्टीतील सर्व मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देवून, कोणीही समुद्रात मासेमारीकरिता जावू नये या करिता सर्व बंदरांवर सूचना देण्यात आल्या असून बहूतांश बोटी किनारी भागात परतल्या असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.
रायगड जिल्ह्यात 25 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा प्रतितास 30-40 किमी वारा येण्याची शक्यता आहे. 26 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
27 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. 28 आणि 29 ऑक्टोबर या दोन दिवसांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी मासेमारी बोटींना समुद्रात जाण्यास बंदी करण्यात आली आहे.
मांडवा- मुंबई प्रवासी बोटसेवा शनिवारी केली बंद, रो-रो सेवा मात्र सुरू
दरम्यान शनिवारी दुपारी तीन वाजल्या नंतर वाऱ्यांचा वेग वाढल्याने तसेच लाटा उसळण्याचे प्रमाण वाढल्याने मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) दरम्यानची प्रवासी बोट सेवा आणि कॅटमरान सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मांडवा येथील अधिकारी अशिष मानकर यांनी सांगीतले. दरम्यान उद्या (रविवार) हवामान विभागाकडून काय अंदाज देण्यात येतो त्यांप्रमाणे ही प्रवासी बोट सेवा सुरु ठेवणे वा बंद ठेवणे या बाबतचा निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान भाऊचा धक्का ते मांडवा ही एम2एम रोरो बोट सेवा मात्र सुरु असल्याचे मानकर यांनी अखेरीस सांगीतले. बोटींच्या इंजिनांचा आवाज थांबला, लाटांचा खळखळाट वाढला कोकणचा किनारा पुन्हा एकदा वादळाच्या सावटाखाली आहे. समुद्रावर जोरात वादळी वारे वाहू लागल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर सुरक्षितपणे नांगरून ठेवल्या आहेत.
दिघी, मुळगाव, जीवना बंदर, आगरदांडा, बागमंडला, श्रीवर्धन, वाशी, शेखाडी या किनारी भागांमध्ये बोटींच्या इंजिनांचा आवाज थांबला असून फक्त लाटांचा खळखळाट ऐकू येत आहे. अजून तीन दिवस दक्षिणेकडील वादळी वारे असंच थैमान घालतील, अशी माहिती किनाऱ्यावरील अनुभवी बुजुर्ग मच्छिमारांनी दिली. त्यामुळे सध्या मच्छिमार आपल्या फाटलेल्या जाळ्या शिवण्यात, बोटींची दुरुस्ती करण्यात आणि येणाऱ्या हंगामासाठी तयारी करण्यात व्यस्त आहेत.
मच्छिमार बांधवांचे अर्थचक्रच थबकले
वादळी वाऱ्यांमुळे समुद्रात जाणं धोकादायक ठरल्याने अनेक मच्छिमारांची उपजीविकाच ठप्प झाली आहे. काही दिवस समुद्र बंद राहिला की घरातील चूल विझते, बाजारात मासळी मिळत नाही, महिलांची रोजंदारी थांबते आणि संपूर्ण किनारपट्टीचं अर्थचक्र थबकले आहे. दरम्यान, बोट वाचवली खरी, पण पोट कसं भरायचं? जाळं सुकतंय, लेकरं भुकेली, आणि बाजारात शांतता आहे. ही व्यथा केवळ एका मच्छिमाराची नाही, तर संपूर्ण कोकणातील हजारो कुटुंबांची असल्याची प्रतिक्रिया श्रीवर्धनमधील एका वृद्ध मच्छिमाराने व्यक्त केली आहे.
मच्छिमार बांधवांसाठी विशेष मदत पॅकेजची मागणी
डिझेल, बर्फ आणि अन्नसामुग्रीच्या वाढत्या किमतींनी मच्छिमारांच्या अडचणी अधिकच वाढवल्या आहेत. बोटींची दुरुस्ती, कर्जफेड आणि बँक हप्त्यांचा ताणही प्रचंड झाला आहे. अनेक ठिकाणी महिला मच्छीविक्रेत्या रोजंदारीशिवाय घर चालवण्याचा संघर्ष करत आहेत. या परिस्थितीत राज्यातील मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, तसेच खा. सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी किनाऱ्यावरील या गंभीर संकटाची दखल घेऊन मच्छिमार बांधवांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी एकमुखी मागणी मच्छिमार समाजाकडून होत आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरेबियन समुद्रात दोन कमी दाबाच्या जागा तयार झाल्या आहेत. त्यापैकी एक आधीच सक्रिय आहे, तर दुसरी 24 ऑक्टोबरला तयार झाली आहे. या दोन्ही जागा काही काळ भारताच्या द्वीपकल्पीय भागाजवळ येणार आहेत. सध्या अरेबियन समुद्राच्या आग्नेय भागात एक खोल दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. गेल्या काही दिवसांत ते भारताकडे सुमारे 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने सरकत आहे. उद्यापासून हे क्षेत्र उत्तर दिशेला सरकणार आहे. पुढील आठवड्यात हे महाराष्ट्राच्या समांतरपणे उत्तरेकडे जाईल. ही जागा समुद्रावरून सरकत असली तरी महाराष्ट्राच्या जवळून जाणार असल्यामुळे त्याचा परिणाम राज्याच्या किनारपट्टी, घाटमाथ्यावर आणि घाटाजवळच्या मध्य महाराष्ट्रात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात पुढील पाच ते सहा दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वेगवान वाऱ्यांसह पडू शकतो.प्रा. डॉ. समीर अरुण बुटाला, भूगोल विभाग प्रमुख, एसएम कॉलेज,पोलादपूर रायगड