रायगड : किशोर सुद
गेली दोन महिन्यांची मासेमारी बंदीची मुदत 31 जुलैला संपत आहे. 1 ऑगस्ट पासून मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात करण्यासाठी कोकणातील सुमारे 14 हजार मच्छीमारी नौकांसह मच्छीमार सज्ज झाले आहेत. म्हावर्याच्या ओढीने पुन्हा एकदा कोकणची समुद्र किनारपट्टी गजबजणार आहे. त्यामुळे नौका-जाळी यांची दुरुस्ती, कामगारांची जमवाजमव अंतिम टप्प्यात आहे. मात्र किनारपट्टीवर वादळी हवामान आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या चिंतेत भर पडली आहे.
आगामी वर्षभरातील आर्थिक तरतुदीच्या दृष्टीने या महत्वाच्या नवीन हंगामासाठी मच्छीमारांची तयारी सुरु आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात समुद्रातील मासेमारी होते. तर मुंबईच्या किनारपट्टीवर मोठा मच्छीमारी व्यवसाय विकसीत होत आहे. कोकणात सुमारे पावणे चार लाख सागरी मच्छीमार आहे.
सागरी क्षेत्रामध्ये पालघर जिल्ह्यामधीलमधील झाईपासून रायगड जिल्ह्यातील मुरुडपर्यंत समुद्राची खोली कमी असल्याने तसेच भरती व ओहटीच्या वेळी पाण्याचा प्रवाह चांगला असल्याने या भागात प्रामुख्याने डोल मासेमारी, गिलनेट मासेमारी, फेक जाळे, गल व दावण पध्दतीने मासेमारी केली जाते.
या मासेमारी पध्दतीत पापलेट, हलवा, करदी, बोंबील, मांदेली यासारख्या प्रजाती पकडल्या जात असून या प्रजातीस बाजारभाव उत्तम असतो तसेच रायगड जिल्ह्यातील मुरूडपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदापर्यंत समुद्राची खोली वाढत जात असल्याने या भागात ट्रॉलिंग, पर्ससीन, गिलनेट, गल व दावण या पध्दतीने मासेमारी केली जात आहे.
या मासेमारी पध्दतीत बांगडा, तारली, टुना, सुरमई, कोळंबी, शिंगाडा, रावस, घोल यासारख्या प्रजाती पकडल्या जातात. यांना बाजारभाव उत्तम असतो व या जाळ्यामध्ये मासळी मिळण्याचे प्रमाण सुध्दा अधिक असते. राज्यामध्ये ठाणे-पालघर जिल्यामध्ये मध्ये डोल व गिलनेट मासेमारी नौकांची संख्या अधिक आहे तर इतर जिल्ह्यात ट्रॉलिंग, गिलनेट, पर्ससीन मासेमारी नौकांची संख्या अधिक आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये रापण या पारंपारिक मासेमारी पध्दतीने मासेमारी केली जाते.
राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून कोकण किनारपट्टीवर 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास निर्बंध घातले जातात. हा काळ माश्यांचा प्रजनन काळ असल्याने, या कालावधीत मासेमारी करू नये हा त्यामागचा उद्देश असतो. हा बंदीचा कालावधी गुरुवारी, 31 जुलै रोजी संपत असून 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवा होणार आहे.नवा हंगामासाठी कोकणच्या किनारपट्टीवरील बंदरात नौकांची डागडुजी, रसद जमा करण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू आहे.
बंदी कालावधीत सुटीनिमित्त गावाकडे गेलेले खलाशी परतू लागले आहेत. त्यामुळे दोन महिने शुकशुकाट असलेल्या बंदरांतील वर्दळ वाढली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या माहितीनुसार, एकट्या रायगड जिल्ह्यात 40 हजारच्या आसपास परप्रांतीय कामगार असून दरवर्षी ही संख्या वाढते. मच्छीमार जाळ्यांची दुरुस्ती, होड्यांची डागडुजी, रंगरंगोटी तसेच इंजिनची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आहे.
कोकणातील जिल्ह्यातील रायगडमध्ये यांत्रिकी 2538, बिगरयांत्रिकी 260, रत्नागिरीमध्ये यांत्रिकी 4130, बिगरयांत्रिकी 453, सिंधुदुर्गमध्ये यांत्रिकी 2603, बिगरयांत्रिकी 744, ठाणे आणि पालघरमध्ये यांत्रिकी 2274, बिगरयांत्रिकी 810 अशा एकूण 13 हजार 792 मच्छीमारी नौका आहेत.
एक ऑगस्टपासून नवा मासेमारी हंगाला सुरुवात होत आहे. कोकणातील मच्छीमारांच्या दृष्टीने नव्या हंगामातील ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने अत्यंत महत्वाचे आहेत. या दोन महिन्याच्या काळात बोंबिल, पापलेट, सुरमई आणि कोळंबी ही व्यापारी दृष्टया महत्वाची मच्छी मिळते. मात्र त्यानंतर ऑक्टोबर ते एप्रिलदरम्यान मासेमारीचा हंगाम थंड असतो. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मिळणार्या मत्स्य उत्पादनावर मच्छीमारांचा वर्षभराचे आर्थिक गणित जुळत असते, अशी माहिती रायगड जिल्हा कोळी समाज संघाचे सचिव प्रवीण तांडेल यांनी दिली.
मच्छिमारीला कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविध व सवलतीं उपलब्ध करून देवून राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये भरीव वाढ करण्याच्या दृष्टीने व स्थानिक पातळीवर मत्स्यव्यवसायाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याकरिता मत्स्यव्यवसाय क्षेत्रास कृषी समकक्ष दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे मच्छीमारांना मत्स्यबीज खरेदी, खाद्य खरेदी, पॅडलव्हील एअरेटर्स, एअरपंपांकरिता आता मत्स्य व्यावसायिकांना अनुदान या निर्णयामुळे मिळणार आहे. शीतगृह व ब कारखान्याला अनुदान, शेतकर्यांना मिळणार्या पीक विमाप्रमाणे मत्स्य शेतकर्यांना, मत्स्य संवर्धक मत्स्यबीजांच्या मत्स्योउत्पादनाच्या नुकसानीसाठी मत्स्य विमा योजना, दुष्काळ किंवा अतिवृष्टीसारर नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळणारी शेतकर्यांना मदत आता मत्स्य व्यावसायिकांना मिळणार आहे.
कृषी समकक्षच्या निर्णयाचे मच्छीमारांनी स्वागत केले असले तरी आधीच मच्छीमारांचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत, तेही मार्गी लागण्याची मागणी होत आहे. राज्यात सन 2022-23 मध्ये 4 लाख 46 हजार 256 मेट्रीक टन उत्कपादन होते. यात सन 2023-24 मध्ये घट होऊन ते 3 लाख 64 हजार 288 मेट्रीक टनावर आले. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत मत्स्य उत्पादन 81 हजार मेट्रीक टनाने घटले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 49 हजार मेट्रीक टन मत्स्य उत्पादन झाले. मुंबई उपनगरात 61 हजार मेट्रीक टन, बृहन्मुंबईमध्ये सर्वाधिक 1 लाख 38 हजार मेट्रीक टन, रायगड जिल्ह्यात 28 हजार मेट्रीक टन, रत्नागिरीत 69 हजार मेट्रीक टन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 हजार 976 मेट्रीक टन मत्स्य उत्पादन झाले आहे.
नवगावातील बोरेश्वर देवस्थानचा सप्ताह आणि पालखी सोहळा झाल्यानंतर मच्छीमार मासेमारीसाठी जातात. त्यामुळे 1 ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरु झाला असला तरी येथील मच्छीमार नारळी पौर्णिमेपासूनच मासेमारीसाठी खर्याअर्थाने सुरु होते. तसेच नवगाव येथे मच्छीमारी बोटी समुद्रात उतरविण्यासाठी क्रेनचा वापर करतात, त्यासाठी काही वेळ लागतो. मात्र मासेमारी उत्पादनाच्या दृष्टीने हा हंगाम महत्वाचा असल्याने मासेमारीसाठी आमची तयारी झाली आहे.अमोल सुरेकर, नाखवा, नवेदर नवगाव, अलिबाग