नवी मुंबईस पाणीपुरवठा करणारे हेटवणे धरण देखील 100 टक्के भरले असल्याने , नवी मुंबईकराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे.  pudhari photo
रायगड

Konkan dams full : कोकणातील धरणे भरली, पाण्याची चिंता मिटली

रायगड जिल्ह्यातील 23 धरणे ओव्हरफुल्ल, पावसाची संततधार

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः मागील काही दिवसांपासून ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोकणातील 90 टक्के धरणे भरली आहेत. रायगड जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 23 धरणे 100 टक्के भरली असून 28 धरणक्षेत्रात सरासरी 93.36 एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यंदा मान्सून मे मध्येच आल्याने गेल्या 60 वर्षात पहिल्यांदाच जुलै महिन्याच्या शेवटीच कोकणातील धरणे भरली असून पाण्याची चिंता मिटली आहे.

पुष्य नक्षत्रात पहिल्या चरणापासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. मध्यंतरी पावसाने तशी विश्रांतीही घेतली होती. पण सोमवारपासून रायगडात पावसाने जोरकस हजेरी लावली आहे. यामुळे जुलैमध्ये होत असलेला पावसाचा जोर आता वाढला आहे.

सोमवारपासून सुरु झालेल्या या पावसाने बुधवारीही जोरकस हजेरी लावली. यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. दरम्यान,गेल्या 24 तासात रायगडात 747 मिमी पावसाच नोंद झाली आहे. हवामान विभागाने अजून दोन दिवस रायगडसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केलेला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 23 धरणे 100 टक्के भरली आहेत. 28 धरणक्षेत्रात सरासरी 93.36 एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली धरणक्षेत्रात 37 टक्के पाणीसाठा आहे. हे धरण वगळता अन्य धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुबलक पाणीसाठा झाला असून हा पाणीसाठा गेल्या वर्षापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी भातसा, तानसा,वैतरणा यासारखी मोठी जलाशय आहेत. या पैकी भातसा धरण हे मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्वात मोठे जलाशय मानले जाते.

भातसा धरणाच्या जल व लाभ क्षेत्रात पडणार्या पावसाचे प्रमाण सद्या वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य पाण्याचा साठा वाढला आहे. भातसा धरणाची पातळी 138. 11 मीटर झाल्याने तसेच धरण क्षेत्रात पावसाच्या पाण्याचे येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत होते. हवामान खात्याने पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवल्याने धरणसाठा नियमित ठेवण्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांनी सांगितले. धरणातील साठा नियंत्रणात ठेवण्यासाठी भातसा धरणाचे तीन गेट 0.25 सेंटीमीटरने उघडल्याने 91 क्यूसेक्स एवढा विसर्ग प्रवाहीत करण्यात आला आहे.

पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने भातसा नदीच्या तीरावरील विशेषतः शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील ग्रामपंचायत मधील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होत आहे. या काळात कोणीही वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या असल्याचे भातसा धरणाचे कार्यकारी अभियंता आर.बी.पवार यांनी सांगितले. तर नेमके योगायोगाने बुधवारच्याच दिवशी भातसा शेजारील तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून धरणाचा एक दरवाजा खुला झाला आहे. सध्या धरणातील विसर्ग 1105 क्यूसेक्स प्रमाणे आहे.तानसा धरणाचा आज सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी एक दरवाजा ओपन होऊन तुडुंब भरून वाहू लागले आहे.

मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी असून आता वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. नवीमुंबईस पाणी पुरवठा करणारे हेटवणे धरण देखील 100 टक्के भरले असल्याने , नवीमुंबईकराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. दरम्यान हेटवणे धरणातून पेण तालुक्यांतील खारेपाटातील गावांना पिण्याचे पाणी मिळावे ही मागणी मात्र अद्याप प्रलंबीतच आहे. हेटवणे धरणातील पाणी खारेपाट क्षेत्रातील गावांना देण्याकरिता करण्यात येत असलेल्या जलवाहीनी करिता पाईप देखील गेल्या दहा वर्षांपासून पडले आहेत. परंतू त्यांची जोडणी मात्र अद्याप होवू शकलेली नाही. महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा आदी तालुक्यातही पावसाचा जोर दिसून आला.

सध्या सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा आदी नद्या दुथडी भरुन वाहू लागलेल्या आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने काही ठिकाणी लगेच पूरजन्य परिस्थितीही निर्माण होत आहे.त्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सतर्त रहात आहे. रोहा तालुक्यात विश्रांतीनंतर मंगळवारी दुपारनंतर पावसाने दमदार सुरुवात केली आहे. सकाळपासूनच पावसाचे वातावरण दिसून येत होते. चांगला पाऊस बुधवारी पडला आहे. विश्रांतीनंतर आलेल्या पावसाचा शेतकर्‍यांना फायदा होणार असून त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात नदी, नाल्यातून पाणी येत असल्याने कुंडलिका नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT